• Home
  • Mumbai
  • वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमण हटावादरम्यान गोंधळ; पुरुषांसह महिलांकडून दगडफेक, पोलिसांच्या कारवाईने काय घडलं?
Mumbai

वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमण हटावादरम्यान गोंधळ; पुरुषांसह महिलांकडून दगडफेक, पोलिसांच्या कारवाईने काय घडलं?

Bandra Railway Station

Bandra Railway Station: वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील गरीबनगर परिसरात अनधिकृत झोपड्यांवर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईचा आज तिसरा दिवस आहे. पश्चिम रेल्वेच्या वतीने असलेल्या या मोठ्या मोहिमेत आज उर्वरित सुमारे 40 टक्के बांधकामे पाडण्याची कार्यवाही सुरू आहे.

कारवाईदरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, काल दुसऱ्या दिवशी परिस्थिती तणावपूर्ण बनली. काही स्थानिक नागरिकांनी कारवाईला विरोध करत पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत पुरुषांसह काही महिलांचाही सहभाग असल्याचे समोर आले असून संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना अचानक काही भागातून पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाकडून विरोध सुरूच राहिला.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी प्रवेश करून काही संशयितांना ताब्यात घेतले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करण्यात आला. या घटनेत काही [पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

अतिक्रमण प्रकरणाची पार्श्वभूमी

१. वांद्रे पूर्व रेल्वे परिसरात रेल्वेचं जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या होत्या.
२. या भागात सुमारे ५०० हुन अधिक झोपड्या असून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे सांगितले जाते.
३. २०१७ पासून या अतिक्रमण हटावाबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.
४. अखेर २०२६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अतिक्रमण हटवण्यास मंजुरी दिली.
५. त्यानंतर पश्चिम रेल्वेने मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे.

सुरक्षा व्यवस्था कडक

आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाकडून संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ही कारवाई पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts