Goregaon Concert News: मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेला लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दोन MBA विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कॉलेज वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित केलेल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे दोन MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एक तरुण आणि एक तरुणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याच घटनेत आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा: पुणे शहरात ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार; पाहा नेमकं काय आहे कारण?
ही घटना शनिवार, ११ एप्रिल रोजी घडली. या कॉन्सर्टला सुमारे २ ते ३ हजार तरुण- तरुणी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान काही सहभागींकडून मोठ्या प्रमाणात मद्यपान व अमली पदार्थांचे सेवन झाल्याने अनेकांना त्रास झाला. त्यानंतर काही जणांची प्रकृती अचानक खालावली.
प्रकृती बिघडलेल्या दोघा विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. हे दोघेही मुंबईतील एका नामांकित व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे.
एक्स्टसी’ या अमली पदार्थांचे सेवन
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संबंधित विद्यार्थ्यांनी ‘एक्स्टसी’ या अमली पदार्थांचे सेवन केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हे पदार्थ कार्यक्रमाच्या आधी तसेच कार्यक्रमादरम्यान घेतल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.
वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन विद्यार्थ्यांसह अमली पदार्थ पुरवठादार आणि कार्यक्रम आयोजनाशी संबंधित व्यक्तींचा समावेश आहे.
दरम्यान, कार्यक्रमस्थळी आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे अमली पदार्थांचा वापर झाल्याचे आणि ही गंभीर घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पुढील तपास सुरू आहे.












