• Home
  • राजकारण
  • “त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे अन् कर्कश डीजे लावून…”, आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी राजकारण्यांना सुनावले खडेबोल
Top News

“त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे अन् कर्कश डीजे लावून…”, आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी राजकारण्यांना सुनावले खडेबोल

mns

Raj Thackeray | आज (14 एप्रिल) भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम, रक्तदान शिबीर, व्याख्याने, प्रभात फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मुंबईतील चैतन्यभूमी परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली आहे. आज सर्व परिसर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेले आहेत. तर आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे.

हेही वाचा –  मोठी बातमी! अशोक खरात प्रकरणात राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हिडीओ समोर, राजकारणात खळबळ

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना अभिवादन करत राजकारण्यांना खडेबोल सुनावले आहेत. राज ठाकरेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील.

पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स’ सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत.

स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी राजकारण्यांवर साधला निशाणा

पुढे त्यांनी राजकारण्यांचे चांगलेच कान टोचले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो. नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापूपीसू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू, असं म्हणत राज ठाकरेंनी राजकारण्यांना खडेबोल सुनावले.

विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts