MPSC Aspirant Death: एमपीएससीची तयारी करून अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या धाराशिवच्या तरुणाचा पुण्यात दुर्दैवी अंत झाला. कर्जाचा वाढता ताण आणि आर्थिक विवंचनेतून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून पुण्यात आलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, खासापुरी गावावरही शोककळा पसरली आहे.
प्रथमेश दिलीप देशमुख असं मृत तरुणाचं नाव आहे. तो धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी गावचा रहिवासी होता. अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो पुण्यात राहून एमपीएससीसह स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता.
हेही वाचा: नोकरदारांनो, पगार २१ हजारांपर्यंत? मग मिळू शकतो हजारोंचा बोनस; जाणून घ्या पात्रता अन् संपूर्ण नियम!
प्रथमेशच्या डोळ्यांत मोठी स्वप्नं होती. मेहनत करून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हायची आणि अधिकारी बनायचं, असा त्याचा ध्यास होता. मात्र, या स्वप्नाच्या वाटेत आर्थिक अडचणी मोठा अडथळा ठरल्या. प्रथमेशवर सुमारे अडीच लाख रुपयांचं कर्ज असल्याचं समजत आहे. कर्जाचा वाढता ताण आणि आर्थिक विवंचनेमुळे त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रथमेशच कुटुंब
प्रथमेश हा पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याच्या वडिलांचं यापूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळे घरातील एकुलता एक मुलगा आणि बहिणींचा आधार म्हणून त्याच्याकडे संपूर्ण कुटुंबाच्या मोठ्या आशा होत्या. प्रथमेश अधिकारी होऊन कुटुंबाची परिस्थिती बदलेल, अशी अपेक्षा त्याच्या बहिणी आणि कुटुंबीयांना होती.
मात्र, अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्याचा जीवनप्रवास थांबला. एका छोट्या गावातून मोठं स्वप्न घेऊन पुण्यात आलेल्या प्रथमेशच्या मृत्यूने कुटुंबीयांसह मित्रपरिवारालाही मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणाची नोंद पुण्यातील नारायण पेठ पोलीस चौकीत करण्यात आली असून, प्रथमेशने हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं, याचा पोलीस तपास करत आहेत.







