Pune : पुण्यातील कात्रज परिसरात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या या तरुणीच्या मृत्यूने विद्यार्थी आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील कात्रज (Katraj News) परिसरातून (Pune Medical Student Death) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माया रेड्डी असं मृत तरुणीचं नाव असून, ती भारती विद्यापीठात (Bharati Vidyapeeth Student) एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचं शिक्षण घेत होती. मूळची हैदराबाद येथील असलेली माया शिक्षणासाठी पुण्यात राहत होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास कात्रज परिसरातील तिच्या राहत्या सोसायटीमध्ये ही घटना घडली. माया इमारतीच्या नवव्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा: डोळ्यांत MPSCचं स्वप्न, डोक्यावर कर्जाचा डोंगर; पुण्यात धाराशिवच्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
माया रेड्डीचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. तिने टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अभ्यासाचा ताण, वैयक्तिक कारण किंवा अन्य कोणत्या परिस्थितीमुळे ही घटना घडली का, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणामागचं नेमकं कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये हळहळ
माया रेड्डी ही वैद्यकीय शिक्षण घेत असल्याने तिच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर भारती विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये (Bharati Vidyapeeth Student) हळहळ व्यक्त होत आहे. तरुण वयात घडलेल्या या घटनेने तिच्या मित्रमैत्रिणींना आणि परिचितांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडून सुरू असून, तपासातून घटनेमागील सत्य समोर येण्याची शक्यता आहे.







