Bawankule Raj Thackeray meet : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे कधी काय निर्णय घेतील अन् चर्चेच्या केंद्रस्थानी येतील याची कोणीच शाश्वती कोणताच राजकीय विश्लेषक देणार नाही. राज यांची भाजपच्या एका बड्या नेत्याने घेतलेल्या भेटीमुळे आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. दरम्यान, ते आमदार, मंत्री नाहीत किंवा खासदारही नाहीत. परंतु त्यांच्या शीवतीर्थ या मुंबईतील बंगल्यावर नेहमीच सर्व राजकीय नेत्यांची वर्दळ असते.
दरम्यान, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. राज यांनी मुंबई महापालिका निवडणूक त्यांचे बंधू आणि ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत लढली होती. मात्र, त्यानंतर काहीच दिवसांत दोन्ही नेत्यांमधील मतभेत समोर आले. मात्र, राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांशी जवळीक साधत उद्धव यांच्याशी दुरावा केल्याचे दिसून येत आहे.
अभूतपूर्व असा केलेला प्रयोग
राज ठाकरे यांच्या पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत केलेली युती राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व असा केलेला प्रयोग होता. पालिकेच्या निवडणुकीदरम्यान, राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा लावून धरत सत्ताधाऱ्यांवरही टीका केली होती. असे असले तरी आता भाजपाचे नेते असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी आहे, त्या भेटीत कोणत्या राजकीय विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु या अनोख्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. @RajThackeray जी यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली.#Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule pic.twitter.com/StOVg4F1lP
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) May 7, 2026
आमच्यात दोन ते चार वेळा चर्चा झाली
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर बावनकुळे यांनी या भेटीचे कारण सांगितले आहे. ही एक सदिच्छा भेट होती. यात राजकीय चर्चा झाली नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले आहे. “मी राज ठाकरे यांना भेटायला गेलो होतो. मी त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्यापासून, मंत्री झाल्यापासून आमच्यात दोन ते चार वेळा चर्चा झाली. मला तुमच्याकडे चहा घ्यायला यायचे आहे, असे मी त्यांना सांगितलेलं होतं. आज राज ठाकरे यांनी चर्चेसाठी चहा घेण्यासाठी मला वेळ दिला,” असे बावनकुळे यांनी सांगितले.
आमची ही भेट खूप चांगली झाली
आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. फक्त मैत्रीतू आमची ही भेट होती. आमची ही भेट खूप चांगली होती. त्यांनी माझा अत्यंत चांगला सन्मान केला. माझी आणि राज ठाकरे यांची मैत्री अबाधित आहे. याच मैत्रीमुळे मी त्यांची भेट घेतली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.










