Pratibha Chakanak’s ED Interrogation : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या (State Women Commission) माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची अंमलबजावणी संचालनालयाने केलेली चौकशी (ED Interrogation) सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. नाशिकचा कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात ही चौकशी करण्यात आली. सुमारे आठ तास चाललेल्या या प्रक्रियेनंतर अनेक खळबळजनक माहिती समोर आली असून, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे संकेत मिळत आहेत.
तपासादरम्यान ईडीला असे आढळून आले की, खरातचे संबंध अनेक राजकीय व्यक्तींशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी आहेत. यामध्ये प्रतिभा चाकणकर यांचे नाव प्रामुख्याने समोर आले. खरातने लोकांची फसवणूक करून जमा केलेला पैसा विविध बँक खात्यांमार्फत वळवल्याचा संशय यंत्रणेला आहे. ईडीच्या तपासात सर्वात महत्त्वाचा दुवा ठरला तो म्हणजे राहाता येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेतील बँक खाती. प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांच्या नावावर या पतसंस्थेत चार वेगवेगळी खाती उघडण्यात आली होती. या खात्यांमधून गेल्या काही वर्षांत सुमारे १ कोटी २० लाख ते २ कोटी ४० लाख रुपयांची संशयास्पद उलाढाल झाल्याचे तपास यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या खात्यांवर ‘नॉमिनी’ म्हणून अशोक खरात याचे नाव नोंदवण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, या खात्यांशी जोडलेला मोबाईल क्रमांकही खरातचाच होता. यामुळे या खात्यांचा ताबा आणि त्यातील व्यवहारांचे नियंत्रण प्रत्यक्षात खरातकडेच होते का?, असा प्रश्न ईडीने उपस्थित केला आहे.
तांत्रिक पुराव्यांनी या प्रकरणातील गुंतागुंत वाढवली
केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे, तर तांत्रिक पुराव्यांनीही या प्रकरणातील गुंतागुंत वाढवली आहे. १ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीतील कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स तपासले असता, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात तब्बल २३० हून अधिक वेळा फोनवर संभाषण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दोघांमध्ये २०० पेक्षा जास्त संदेशांची देवाणघेवाण झाली आहे. वारंवार होणारा हा संपर्क केवळ ओळखीचा नसून तो व्यावसायिक किंवा आर्थिक हितसंबंधांशी निगडित असावा, असा संशय ईडीला आहे. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर प्रतिभा चाकणकर यांनी आपली बाजू मांडली. त्यांनी स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
व्यवहारांची मला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती – प्रतिभा
“माझ्या नावाचा गैरवापर करण्यात आला असून, माझी बनावट स्वाक्षरी करून ही बँक खाती उघडण्यात आली. या खात्यांबाबत किंवा त्यातील व्यवहारांबाबत मला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती,” असा दावा त्यांनी केला आहे. तसेच तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेले फोन कॉल्स आणि मुलाच्या नावावर असलेली खाती यावर त्यांनी दिलेल्या उत्तरांनी तपास यंत्रणेचे पूर्ण समाधान झाल्याचे दिसत नाही. या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) या रूपाली चाकणकर यांच्या सख्ख्या भगिनी असल्याने विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे.
प्रतिभा चाकणकर अन् मुलगा तन्मयची ईडी चौकशी
ईडीने आता प्रतिभा चाकणकर यांचा मुलगा तन्मय यालाही चौकशीसाठी पाचारण केले आहे. आई आणि मुलाच्या नावावरील खात्यांचा स्रोत काय होता आणि खरातशी त्यांचे नेमके काय संबंध होते, याची कसून चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणातून आणखी काही बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्तास, या चौकशीमुळे चाकणकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली असून, आगामी काळात न्यायालयीन लढाई आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
ईडीचा मोर्चा आता रूपाली चाकणकरांकडे वळणार?
खरात प्रकरणाचा तपास करत असताना ईडीनं आता आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्याकडे वळवला आहे. प्रतिभा चाकणकर यांच्या चौकशीनंतर, खरात आणि चाकणकर कुटुंबातील जवळीक अधिक गडद होताना दिसत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करताना त्याला राजकीय पाठबळ लाभल्याचा संशय ईडीला सुरुवातीपासून होता. तपासादरम्यान समोर आले की, खरात केवळ प्रतिभा चाकणकर यांच्याच संपर्कात नव्हता, तर रूपाली चाकणकर यांच्याशीही त्याचे कौटुंबिक संबंध होते. काही सार्वजनिक कार्यक्रमांतील त्यांची उपस्थिती आणि सोशल मीडियावरील फोटो आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.
खराच्या बँक खात्याचे नाॅमिनी चाकणकर कुटुंबातील सदस्य
याच प्रकरणात रुपाली चाकणकर यांना आपलं महिला आयोगाचं अध्यक्षपद तर गमवावं लागलंच आहे, पण पक्षानंही त्यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आलीय, अशोक खरात याच्या माध्यमातून वळवण्यात आलेला पैसा राजकीय कामांसाठी किंवा निवडणूक निधीसाठी वापरला गेला का, याचीही चाचपणी सुरू आहे. खरातच्या बँक खात्यांचे ‘नॉमिनी’ हे चाकणकर कुटुंबातील सदस्य असणे, ही बाब साध्या ओळखीच्या पलीकडचे संबंध दर्शवते. आगामी काळात, रुपाली चाकणकर यांनाही या संदर्भात स्पष्टीकरणासाठी बोलावले जाऊ शकते. या प्रकरणामुळे केवळ चाकणकर कुटुंबच नव्हे, तर त्यांच्या पक्षाचीही कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












