मुंबई Marathi Language Row : महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं राज्यात मराठी अस्मिता आणि भाषेवरुन राजकारण तापलं आहे. एकीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी न बोलणाऱ्यांवर आणि सरकारच्या सौम्य धोरणावर तीव्र टीका केली आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिकलीच पाहिजे, पण हिंसाचाराचा अवलंब खपवून घेतला जाणार नाही. यामुळं मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे विरुद्ध राज्य सरकार असंच काहीसं चित्र पुन्हा पाहायला मिळतंय.
हेही वाचा : टीपू सुलतान प्रेरणास्थान, छत्रपती शिवरायांचाही उल्लेख; अमरावतीतील लग्नपत्रिका सोशल मीडियावर
मराठी न बोलण्याचं धाडस ते कसं करु शकतात :
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपला नेहमीचा आक्रमक पवित्रा दाखवला. रिक्षाचालकांसाठी मराठी सक्तीची करण्याच्या निर्णयावर आणि त्यानंतर दिलेल्या शिथिलतेवर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांचं नाव न घेता ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधत म्हटले, “आपले मंत्री थोडासा विरोध झाल्यास मुदतवाढ 3-4 महिन्यांनी वाढवतात. अशी लवचिकता गुजरात, तामिळनाडू किंवा इतर राज्यांमध्ये चालेल का?” महाराष्ट्रात राहणारी व्यक्ती मराठी बोलणार नाही असं म्हणण्याचं धाडस कसं करु शकते, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी पुढे उपस्थित केला. त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की, समोरची व्यक्ती हिंदीत बोलली किंवा ओरडली तरी, त्यांनी मराठीतच उत्तर द्यावं आणि आपली मतं मराठीतच व्यक्त करावीत. इतरांना ते आवडलं नाही तरी परिणाम साधण्याचा हाच योग्य मार्ग आहे, असं म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं.
मुख्यमंत्री फडणवीस यांचं प्रत्युत्तर :
हुतात्मा चौकात शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यांना गंभीर प्रत्युत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानं स्थानिक भाषा मराठी शिकली पाहिजे हे खरं आहे. पण भाषिक अभिमानाच्या नावाखाली हिंसाचार किंवा दहशत निर्माण करणं चुकीचं आहे.” राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र कधीही संकुचित विचारसरणीचं राज्य नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या महाराष्ट्र धर्माचा संदर्भ देत ते म्हणाले की, आपल्या राज्यात स्थलांतरितांना हद्दपार करण्याची किंवा त्यांच्याशी भेदभाव करण्याची मानसिकता नाही. त्यांनी अभिमानानं सांगितलं की, आज मराठी बांधव देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन तेथील संस्कृती आणि विकासात योगदान देत आहेत.












