Thalapathy Vijay Oath Ceremony : तमिळनाडूच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक दिवस आहे. सुपरस्टार ते यशस्वी राजकारणी असा प्रवास करणारे जोसेफ विजय आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडला असून राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापनेसाठी अधिकृत निमंत्रण दिले आहे. आज 10 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता चेन्नई येथील नेहरू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हा भव्य शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्येच तमिळनाडूत विजय राज येणारे आहे.
तमिळनाडू विधानसभा 2026 ची निवडणूक स्वबळावर लढवणाऱ्या ‘तामिळनाडू व्हिक्टरी पार्टी’ने (TVK) 108 जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. खुद्द विजय यांनी पेरांबूर आणि त्रिची ईस्ट या दोन्ही मतदारसंघांतून प्रचंड मताधिक्याने विजय संपादन केला. मात्र, 234 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी 118 हा आकडा गाठणे आवश्यक होते. टीव्हीकेला यासाठी 10 ते 12 जागांची गरज होती.
हेही वाचा – केरळचा किल्लेदार कोण? दिल्लीत मोठ्या घडामोडी, ‘ही’ नावे चर्चेत…
बहुमताअभावी सत्तास्थापनेचा पेच निर्माण
सुरुवातीला बहुमताअभावी सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता, मात्र त्यानंतर वेगाने राजकीय हालचाली घडल्या. काँग्रेसने आपल्या 5 आमदारांचा पाठिंबा विजय यांना जाहीर केला. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI)-2, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M)-2, लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळनाडू (VCK) -2 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) -2 यांनीही टीव्हीके सरकारला बिनशर्त पाठिंबा देण्याचे पत्र राज्यपालांना सादर केले. या पाठिंब्यामुळे विजय यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे संख्याबळ 120 वर पोहोचले असून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे, डाव्या पक्षांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा पाठिंबा दिला असून ते मंत्रिमंडळात सामील होणार नाहीत, असं स्पष्ट केलं आहे.
काय आहे जोसेफ विजयची पार्श्वभूमी?
थलपती विजय याचं खरं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे. त्याचे चाहते त्याला थलपती विजय म्हणतात. विजयचा प्रवास हा एखाद्या सिनेमाच्या पटकथेसारखा आहे. कारण बालपणापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असणारा विजय आता तामिळनाडून मोठं राजकीय नेतृत्व म्हणून उदयास येताना दिसतोय. विजयचा जन्म 22 जून 1974 रोजी चेन्नई इथे झाला होता. त्याचे पिता एस. ए. चंद्रशेखर हे तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक राहिले आहेत. तर त्याची आई शोभा या एक प्रसिद्ध गायिका आहेत. घरातच अभिनयाचे बाळकडू मिळाल्याने विजयने बालवयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
‘वेट्री’ चित्रपटातून अभिनयात पदार्पण
विजयने ‘वेट्री’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. यानंतर 1992 मध्ये ‘नालैया थीरपू’ चित्रपटात हिरो म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली होती. विजयला गिल्ली या चित्रपटाने जास्त लोकप्रियता मिळवून दिली. तसेच अनेक चित्रपटांमधील सामाजिक मुद्द्यांमुळे विजय जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. विजयच्या थेरी, मर्सल आणि बिगिल या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड केले. विजयने रोमान्स, अॅक्शन, कॉमेडी आणि सामाजिक मुद्द्यांवर आधारित चित्रपट करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे केवळ अभिनेताच नाही तर तो डान्सर म्हणूनही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
विजयची राजकारणात एन्ट्री
विजयने 2024 मध्ये राजकारणात अधिकृतपणे एन्ट्री केली. त्याने तमिलगा वेट्री कडगम (TVK) पक्षाची घोषणा केली. 27 ऑक्टोबर 2024 रोजी विजयची पहिली सभा पार पडली. या सभेला प्रचंड मोठा जनसागर लोटला होता. त्यामुळे त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचे संकेत तेव्हाच मिळाले होते. विजयने आपल्या पक्षाची घोषणा करतानाच 2026 च्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे त्याने स्पष्ट केलं होतं. तमिळनाडू विधानसभा 2026 ची निवडणूक स्वबळावर लढवणाऱ्या ‘तामिळनाडू व्हिक्टरी पार्टी’ने (TVK) 108 जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला.












