SSC Result 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच वर्चस्व राखले आहे. तर विभागावार निकालात कोकण विभागाने ९७.६२ टक्क्यांसह राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर (८८.४१ टक्के) विभागाचा लागला आहे.
निकालाच्या आकडेवारीनुसार, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९६ टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण ८९.५६ टक्के इतके आहे. राज्यातील एकूण १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ५.४० टक्क्यांनी अधिक लागला आहे. विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने यंदा दहावीची परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस लवकर घेण्यात आली होती. एकूण ६४ विविध विषयांमध्ये ही परीक्षा पार पडली होती, त्याचा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात परीक्षा अत्यंत निकोप आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे, ६४ पैकी २० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. या निकालानुसार, एकूण १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये २८,०२५ विद्यार्थ्यांनी खाजगी १७ नंबरचा फॉर्म भरून परीक्षा दिली होती. त्यापैकी २२,००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी ७६.३३% एवढी आहे. २८,८६७ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली यामध्ये ९,७५७ जण उत्तीर्ण झाले आहे. त्याची टक्केवारी ३३.८९% एवढी आहे. तर ९,९१२ दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ९,०४२ उत्तीर्ण झाले आहेत त्याची टक्केवारी ९१.२२% एवढी आहे.












