Karnataka Accident | कर्नाटकमध्ये (Karnataka) एक धक्कादायक घटना घडली आहे. नाटक बघायला गेलेल्या लहान मुलांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाट्यप्रयोगादरम्यान कमानीचा काही भाग कोसळल्याने दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
कमान कोसळून 2 मुलांचा मृत्यू, नेमकं घडलं काय?
शनिवारी (18 एप्रिल) कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यात एका खुल्या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. तर या नाट्यप्रयोगादरम्यान कमानीचा काही भाग अचानक कोसळल्यामुळे दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. तर या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मानवी तालुक्यातील बैल मार्चाड गावात घडली आहे. तर नाट्यप्रयोगादरम्यान सात जण कमानीखाली बसून नाटक पाहत होते. त्यावेळी एक कमान अचानक कोसळली आणि त्यात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलांची ओळख पटली आहे. यामध्ये विश्वनाथ रामलिंगा (वय 8) आणि संविथा (वय 2) अशी मृतांची नावे आहेत. तर सध्या या दोघांचे मृतदेह मानवी शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, या घटनेत विशाक्षी (25), लक्ष्मी (18), विशालाक्षी (25), येल्लम्मा (3) आणि बसम्मा (45) या पाचजणी गंभीर जखमी झाल्या आहेत. सध्या सर्व जखमींना रायचूर आयुर्वेद संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी मानवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.











