Uddhav Thackeray: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी पक्षाला रामराम केल्यानंतर काही दिवसांतच आमदार सचिन अहिर यांनीही ठाकरे गटाची साथ सोडली. त्यानंतर आता शुभांगी पाटील यांनीही पक्षातून बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाला आणखी एक धक्का बसला असून शुभांगी पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
मध्यरात्री पक्षप्रवेशाची घोषणा
मुंबईत मध्यरात्री झालेल्या कार्यक्रमात शुभांगी पाटील यांनी शेकडो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईकआणि मंत्री भरत गोगावले यांच्यसह पक्षातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
अलीकडील काही दिवसांत ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शुभांगी पाटील यांचा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे.
उमेदवारी नाकारल्याने नाराजी
पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना शुभांगी पाटील यांनी आपल्या नाराजीची करणे स्पष्ट केली. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात अनेक वर्षे काम करूनही पक्षाने उमेदवारीसाठी आपल्या नावाचा विचार केला नाही, असा दावा त्यांनी केला. दीर्घकाळ पक्षासाठी काम करूनही योग्य संधी मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच, शिक्षक आणि कार्यकर्त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला, अनेक आंदोलने केली, मात्र त्याची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली नाही, असेही त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप
शुभांगी पाटील यांनी पक्षातील संवादाच्या अभावावरही टीका केली. कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेतृत्वाची भेट मिळणे कठीण झाले असून त्यांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. पक्ष सोडण्याचा निर्णय कळवूनही कोणी संपर्क साधला नाही किंवा नाराजीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, असे त्या म्हणाल्या.
शिंदे गटातील नेतृत्वाने मात्र कार्यकर्त्यांच्या प्रश्नांवर सकारत्मक भूमिका घेतल्याचे सांगत त्यांनी नव्या जबाबदारीत प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कोण आहेत शुभांगी पाटील?
शुभांगी पाटील या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील सक्रिय नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नांवर आंदोलने आणि संघटनात्मक काम केले आहे. हजारो शिक्षक आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क असल्याचे सांगितले जाते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या पाटील यांनी यापूर्वीही अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले आहे.
श्रीकांत शिंदे यांचे सूचक वक्तव्य
पक्षप्रवेशानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुभांगी पाटील यांचे स्वागत करत त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या काही दिवसांत अनेक लोकप्रतिनिधींनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पक्षात प्रवेश केला असून आगामी काळात आणखी काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असे सूचक संकेतही त्यांनी दिले.












