Maharashtra Rain Alert: पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने पुणे, लोणावळा मुंबई, ठाणे, रायगड आणि परिसरातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून काही ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे शहरात सकाळ दिवसांपासून जोरदार पाऊस
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी अधिक तीव्र रूप धारण केले. पुणे शहरात सकाळ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत राहिला, तर रात्रीपर्यंत त्याचा वेग कायम होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून घाटमाथा भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा: अमरनाथ यात्रेकरूंना पंतप्रधान मोदींचे पत्र; ‘व्होकल फॉर लोकल’सह ५ महत्त्वाचे संदेश
कल्याण-डोंबिवली
दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिसरात मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले. आंबेडकर रोडसह काही प्रमुख मार्ग जलमय झाले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबई आणि ठाणे
मुंबई आणि ठाणे परिसरातही सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला दिसून आला. काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आवश्यक ठिकाणी मदत पथके आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
कोकण विभाग
कोकण विभागातही मुसळधार पावसाचा प्रभाव कायम असून पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार गुजरात किनारपट्टीपासून आग्नेय अरबी समुद्र परिसरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक भागांवर होणार आहे.
प्रशासनाचा नागरिकांना आवाहन
प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. नदीकाठ, पूरप्रवण भाग आणि डोंगराळ परिसरात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संबंधित स्थनिक प्रशासनाशी किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. मदतीसाठी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 1916 आहे. ठाणे महानगरपालिकेसाठी 022-25364779, 022-25301740 आणि +91 93723 38827, तसेच ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी 1800-222-108 आणि 8657887101 हे क्रमांक उपलब्ध आहेत. पालघर जिल्ह्यासाठी 02525-297474 आणि +91 82379 78873 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. पनवेल महानगरपालिकेच्या मदत केंद्राशी 022-27458040, 022-27458041 किंवा 022-27458042 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत हवामान सूचना आणि प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: बाजारात सोन्या-चांदीचा धमाका! किती वाढले दर? जाणून घ्या प्रमुख शहरांतील आजचे अपडेटेड भाव
मध्यरात्री एक मोठे झाड रस्त्यावर कोसळ
पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शहरातील सेनापती बापट रस्त्यावर पाहायला मिळाला. मध्यरात्री एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले, तर शेजारील एका खासगी रुग्णालयाची संरक्षक भिंतही झाडाच्या धडकेत कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.












