Nidhi Agrawal crowd incident : लवकरच साऊथ सुपरस्टार प्रभास यांचा द राजा साब हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बुधवारी हैदराबाद येथे चित्रपटातील सहाना सहाना गाण्याचा लॉन्चिंग कार्यक्रम पार पडला. परंतु चित्रपटातील अभिनेत्री निधी अग्रवाल या कार्यक्रमातून बाहेर पडत असताना तिला प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. याशिवाय गर्दीमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.
हैदराबाद येथील लुलु मॉलमध्ये गाण्याच्या लॉन्चिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी दिग्दर्शक मारुती आणि चित्रपटातील मुख्य अभिनेत्री निधी अग्रवाल हे उपस्थित होते. यावेळी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. कार्यक्रम सुरळीत पार पडला. परंतु कार्यक्रम संप्पन्न झाल्यानंतर गोंधळ सुरु झाला. या गोंधळात अभिनेत्री निधी अग्रवाल गर्दीमध्ये अडकली. त्यानंतर वाट काढत बॉडीगार्डने अभिनेत्री निधी अग्रवाल यांना कार पर्यंत सोडले.
हे ही वाचा : धुरंधर चित्रपटाच्या यशाबददल अक्षय खन्ना यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओ मध्ये निधी प्रचंड घाबरलेली आणि अस्वस्थ दिसत होती. त्यानंतर तिला बॉडीगार्डने कार पर्यंत सोडले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून युजर्स तेथील दुरावस्था बघुन आक्रमक होताना दिसत आहे. हा प्रभास चा चित्रपट असल्याने चाहत्यांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले.
कधी होणार प्रदर्शित
प्रभास चा द राजा साब चित्रपट हॉरर असल्याचे सांगितले जात असून हा चित्रपट मारुती यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात संजय दत्त, निधी अग्रवाल, मालविका मोहनन आणि रिद्धी कुमार यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा जानेवारी 2024 मध्ये करण्यात आली होती. हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजे 9 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.












