BJP-Shinde Group seat-sharing : सध्या राज्यात निवडणुकींचे वारे वाहत आहे. नुकत्याच राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात पुणे महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे. विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांना या चर्चेतून डावलण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपचे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली होती. तसेच ते चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका करत असतात. त्यामुळं आजच्या बैठकीचं त्यांना आमंत्रण नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलं आहे.
हेही वाचा – फडणवीसांची मोठी खेळी, थेट राज्यपालांकडे कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिंदे गटात प्राथमिक बैठकीला सुरुवात झाली आहे. पुण्यातील रामी ग्रँड हॉटेलमध्ये दोन्ही पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला भाजपकडून मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, धीरज घाटे उपस्थित होते तर शिंदे गटाकडून निलम गोऱ्हे, विजय शिवतारे, नाना भानगिरे हे उपस्थित होते.
बैठकीसाठी रवींद्र धंगेकरांना आमंत्रणच नाही
भाजपवर टीका करणे रवींद्र धंगेकर यांना भोवल्याचं बोललं जातंय. पुण्यातील भाजप शिंदे गटाच्या बैठकीला रवींद्र धंगेकर यांना आमंत्रण देण्यात आलं नाही. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या बैठक सुरू आहेत. काँग्रेसमधून शिवसेनेत आल्यानंतर रवींद्र धंगेकर यांच्याकडे शिवसेनेचे पुणे शहराचे महानगर प्रमुखपद देण्यात आलं आहे. मात्र, भाजप मधील नेत्यांवर टीका केल्याने आज त्यांना बैठकीचे आमंत्रण नाही, अशी माहिती आहे.
शिवसेना 35-40 जागांसाठी भाजपकडे प्रस्ताव देणार
पुण्यात भाजप नाही तर शिवसेनेकडून रवींद्र धंगेकरांना डावलण्यात येत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण भाजपने आपल्या स्थानिक नेत्यांना दिलं आहे अशी माहिती भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे. तर शिवसेनेने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना अशी कोणतीही माहिती दिली नसल्याचे समोर आले आहे. महायुतीत 35-40 जागांसाठी शिवसेना भाजपकडे प्रस्ताव देणार आहे, अशी चर्चा आहे.
भाजप नेत्यांवर टीका करणे धंगेकरांना भोवलं
रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना भाजपच्या हेमंत रासने यांच्याकडून दारून पराभव स्वीकारावा लागला. काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर काही काळ शांत होते. मात्र, जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकर यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे त्यांना या बैठकीपासून लांब ठेवल्याचं सांगितलं जातय. भाजप नेत्यांवर टीका करणे रविंद्र धंगेकरांना चांगलच भोवलं आहे.












