PSLV C62 Satellite : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) उद्या, 12 जानेवारी रोजी या वर्षातील पहिली अंतराळ मोहीम प्रक्षेपित करणार आहे. इस्रोचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV-C62) पृथ्वी निरीक्षण उपग्रह (EOS-N1) अवकाशात घेऊन जाईल. PSLV-C62 रॉकेट EOS-N1 सोबत 14 इतर पेलोड देखील घेऊन जाईल. हे अभियान इस्रोच्या व्यावसायिक शाखा, न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) द्वारे चालवलं जात आहे.
काय म्हणालं इस्रो :
इस्रोनं शनिवारी सांगितलं की रॉकेट आणि उपग्रहांचं एकत्रीकरण पूर्ण झालं आहे. PSLV-C62 मोहीम 12 जानेवारी रोजी सकाळी 10:17 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होणार आहे. या मोहिमेसाठी 25 तासांची उलटी गिनती 11 जानेवारी रोजी सुरु झाली आहे.
PSLV चं 64नं उड्डाण :
इस्रोनं सांगितलं की हे PSLV चं 64वं उड्डाण असेल. या मोहिमेमुळं, भारतीय भूमीवरुन प्रक्षेपित केलेल्या परदेशी उपग्रहांची एकूण संख्या 442 वर पोहोचेल. PSLV नं आतापर्यंत 63 उड्डाणं पूर्ण केली आहेत, ज्यात चांद्रयान-1, मार्स ऑर्बिटर मिशन आणि आदित्य-L1 मिशन यांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत, रॉकेट थायलंड आणि ब्रिटननं बनवलेला पृथ्वी निरीक्षण उपग्रह, इतर 13 उपग्रहांसह, प्रक्षेपणानंतर 17 मिनिटांत इच्छित सूर्य-समकालिक कक्षेत ठेवेल. रॉकेटचा चौथा टप्पा (PS4) वेगळं करणं आणि स्पॅनिश स्टार्टअपच्या केस्ट्रेल इनिशियल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर (KID) कॅप्सूलचं प्रात्यक्षिक प्रक्षेपण प्रक्षेपणानंतर दोन तासांनी होण्याची अपेक्षा आहे.
भारतातून प्रक्षेपित केलेल्या परदेशी उपग्रहांची सख्या 442 वर :
स्पॅनिश स्टार्टअप कंपनीनं विकसित केलेलं केआयडी, कक्षेत स्थापित केल्यानंतर पृथ्वीच्या वातावरणात परत आणलं जाईल. PS4 स्टेज आणि केआयडी कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करतील आणि दक्षिण पॅसिफिक महासागरात पडतील. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितलं की, या मोहिमेमुळं भारतीय भूमीवरून प्रक्षेपित केलेल्या परदेशी उपग्रहांची एकूण संख्या 442 वर पोहोचेल.
PSLV चं महत्त्व काय? :
या रॉकेटमध्ये ईओएस अन्वेषा उपग्रह आहे, जो समुद्राचं निरीक्षण करेल. या मोहिमेतून हे दिसून येईल की मागील सुधारणांपेक्षा रॉकेटमध्ये किती सुधारणा झाली आहे. यावेळी, PSLV भारत आणि परदेशातील अनेक लहान उपग्रह वाहून नेत आहे. यामध्ये एआय, इंटरनेट आणि विद्यार्थ्यांनी बनवलेले संशोधन उपग्रह समाविष्ट आहेत.
इस्रोचे अध्यक्ष तिरुपती बालाजीच्या दर्शनाला :
PSLV-C62 मोहिमेच्या प्रक्षेपणापूर्वी शनिवारी तिरुपती येथील वेंकटेश्वर मंदिरात इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी प्रार्थना केली. ते रॉकेटची लघु प्रतिकृती सोबत घेऊन आले होते.






