Election campaigning ends today : गेल्या आठवड्याभरापासून महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यंदा 29 महापालिका निवडणुकांचा धुराळा उडणार असून आजचा महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. आठवड्यापासून सुरु असलेल्या प्रचार सभा, रॅली आज संध्याकाळी 5 वाजेनंतर थंडावल्याचे चित्र दिसेल. तर दिवसभर राज्यभरात सभा, रॅलीचा धडाका आणि शक्तिप्रदर्शने बघायला मिळतील. त्यानुसार आज राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचार, सभा, रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आज या प्रचाराचा शेवटचा दिवस असून आठवड्याभरात उमेदवारांनी अनेक प्रचार सभा घेतल्या. रॅली काढली, सोशल मीडियाचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तर काही ठिकाणी हटक्या पद्धतीने निवडणुकीचा प्रचार करण्यात आला. आता या प्रचारसभा थंडावतील, आणि दोन दिवसांनी निवडणूकांचा कार्यक्रम पार पडेल. म्हणजे 15 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकांचा धुराळा उडेल आणि 16 जानेवारी रोजी निवडणुकांचा निकाल हाती येईल.
हे ही वाचा : ५०० कोटींचा घोटाळा आणि भाजपची उमेदवारी? शिवाजीराव भोसले बँकेचे ठेवीदार रस्त्यावर
सायकल आणि बाईक वरून प्रचार
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुराळा उडाला आहे. काही ठिकाणी व्हिडिओ स्क्रीन लावून तर डिजिटल बॅनरने, आकर्षक वाहने सजवून, कुठे मंजुळ तर दणदणीत आवाजात बनवलेली ध्वनिफीत असा हटके प्रचार सुरू आहे. तर नाशिकच्या मालेगावात आजही विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार सायकल व बाईकवरून प्रचार करण्यास प्राधान्य देत आहे .सायकल तसेच बाईकवर बॅटरी, ध्वनिक्षेपक , पक्षाचा बॅनर बांधून गल्लोगल्ली प्रचार करताना दिसत आहे.
पुकारेवाल्यांचा वापर
नाशिक जिल्ह्यातील मालेगावात मयत झाली की परिसरातील नागरिकांना अंत्यविधीचा संदेश देण्यासाठी पुकारा देण्याची पद्धत आहे. त्यासाठी काही खास पुकारेवाले आहेत. त्यावर त्यांचा रोजगार चालतो मात्र सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून या पुकारेवाल्याचा आपल्या उमेदवारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी वापर केला जातो. त्यांना परिसराची माहिती असते अगदी अडचणीच्या गल्लीबोळात हे पुकारे प्रचार करतात. मालेगाव शेकडो पुकारेवाले कोणी सायकल तर कुणी बाईकवरून प्रचाराच्या कामात व्यस्त आहे.












