Maya Film Motion Poster : आपण एकटेपणाला खूप घाबरतो, पण आपल्याला खरी भीती वाटते, ती पोरकेपणाची’ अशा आशयासह एका नवीन चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. नात्यांमधला गुंता सोडवायचा असेल तर हृदयात माया हवी अशी टॅगलाईन असलेला माया चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काय आहे पोस्टर मध्ये
माया चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले असून या पोस्टर मध्ये वेगवेगळ्या पिढ्यांमधील सदस्य दिसत आहे. त्यांच्या नात्यातील समजूतदारपणा, आपुलकी, आणि वयात अंतर फार असले तरीही टिकून राहणारी माया अतिशय शांतपणे मांडण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये मुक्ताच्या हातात तुटलेला कप दिसत असून ती हा कप फेव्हिस्टिकच्या माध्यमातून चिटकवताना दिसत आहे. हा कप चिटकवताना पोस्टर मध्ये दिसत असलेल्या कोणाच्याच चेहऱ्यावर राग किंवा दुःख नसून सर्वजण आपुलकीने हसताना दिसत आहे. हा कप फक्त अपघाताने तुटलेला नसून तो नात्यातील तडे, अबोल दुःख, आणि आयुष्यात येणारी पोकळी दर्शवतो. आणि त्यात हातात फुटलेला कप असून देखील मुक्ताच्या चेहऱ्यावर थोडाही दुःख नाही तर चेहऱ्यावर शांत अशी स्माईल, यातून असं म्हणता येईल कि, तिने दुःख नाकारलं नाही तर स्वीकारलंय.
हे ही वाचा : पलाश मुच्छलची मूव्हऑन नंतर नवी सुरुवात; श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार
मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत
आदित्य इंगळे दिग्दर्शित माया या चित्रपटाची 24व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय झेप घेतल्याने चित्रपट पाहण्याची ओढ प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचा भावनिक आशय, संवेदनशील कथा आणि दमदार कलाकारांचा अभिनय यामुळे प्रेक्षकांकडून माया या चित्रपटाला वेगळीच अनुभूती मिळण्याची अपेक्षा आहे.
View this post on Instagram
नात्यांच्या गुंत्यांतून उमटणारी कथा
मोशन पोस्टर मध्ये भावना या शब्दांशिवाय पोहोचवायच्या होत्या. नात्यांच्या गुंत्यांतून उमटणारी कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणारी ठरेल अशा अशा असल्याचे मत दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी व्यक्त केले. या चित्रपटाची रिलीज पूर्वीच चांगली चर्चा असल्याने प्रेक्षकांना हा चित्रपट प्रदर्शित कधी होणार याकडे लक्ष लागून आहे. हा चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु तुम्हाला हा चित्रपट लवकर पाहायचा असेल तर 21 जानेवारीला तुम्ही पुणे इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये बघू शकतात.
हे कलाकार असणार मुख्य भूमिकेत
माया हा चित्रपट शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित करण्यात आला आहे. तर आदित्य इंगळे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अल्का दातार, नितीन प्रकाश वैद्य हे असणार आहे. चित्रपटाच्या कथा, पटकथा आणि संवादाची धुरा डॉ. समीर वसंत कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे सह डॉ. गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी हट्टगंडी आणि विजय केंकरे हे कसलेले कलाकार मुख्य भूमिकेत आहे.












