Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे १८ हजारांहून अधिक मतांसह पुढे असून काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना फटका बसला आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra vidhan parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह पाटील आणि महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि इतर उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मतमोजणीच्या कलांमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत.
मराठवाडा पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटलांची मुसंडी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या तिसऱ्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील (DR. Prapsinh Patil) यांनी महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांच्यावर १३ हजार १६३ मतांची आघाडी घेतली. पाटील यांना ७३ हजार ९३१ मते मिळाली, तर सतीश चव्हाण यांना ६० हजार ७६८ मते मिळाली. अपक्ष उमेदवार रविराज ऊर्फ अण्णासाहेब सावळे-पाटील यांना १९ हजार ८३५ मते मिळाली. (Voter Counting)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप घुगे यांना ८ हजार ४३९ मते मिळाली. सतीश चव्हाण यांनी यापूर्वी सलग तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे यंदाच्या मतमोजणीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी घेतलेली आघाडी लक्षवेधी ठरली आहे. मात्र, पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करता आला नसल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी महत्त्वाची ठरणार आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे आघाडीवर
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे (Kaustubh Gavade) यांनी आघाडी कायम ठेवली. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, गावडे यांना १८ हजार ३८५ मते मिळाली होती. शिवसेना समर्थित अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना ११ हजार ९८३ मते मिळाली. काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना अपेक्षित यश मिळाले नाही. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीदरम्यान त्यांना बाद करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यांना ८ हजार ९६५ मते मिळाल्याचे वृत्त आहे. यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. (Graduate Constituency Result)
पुणे पदवीधर मतदारसंघाची लढत मात्र वेगळी आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव आणि भाजपच्या स्मिता जाधव यांच्यात प्रमुख लढत झाली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये हर्षदा देशमुख-जाधव आघाडीवर असल्याची माहिती समोर आली होती. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये पसंतीक्रमानुसार मतदान झाले असल्याने मतमोजणीची प्रक्रिया नेहमीच्या मतमोजणीपेक्षा अधिक वेळ घेऊ शकते. पहिल्या पसंतीच्या मतांनंतर आवश्यक कोटा पूर्ण न झाल्यास पुढील पसंतीची मते मोजली जातात. त्यामुळे सुरुवातीची आघाडी आणि अंतिम विजय यांत फरक असू शकतो.
हेही वाचा : 8th Pay Commission : ८व्या वेतन आयोगाचे ५ महत्त्वाचे अपडेट्स! केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी काय बदलणार?
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक आघाडीवर
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांनी आघाडी कायम ठेवली आहे. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, १७ व्या बाद फेरीनंतर सरनाईक यांना ८,५७५ मते मिळाली असून ते ३,६५० मतांनी पुढे आहेत. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांनी दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. त्यांना ४,९२५ मते मिळाली, तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ४,९२१ मते मिळाली आहेत.
त्यामुळे या दोघांमधील फरक अवघ्या चार मतांचा आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू असल्याने अंतिम निकालाबाबत उत्सुकता कायम आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला १६,१३४ मतांचा कोटा पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी निर्णायक ठरणार आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातील अंतिम निकालाकडे महायुतीसह महाविकास आघाडीचेही लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात रस्सीखेच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर या गृहप्रदेशात विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये आघाडी-पिछाडीचा खेळ सुरू होता. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला. दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे सुधाकर कोहळे यांनी ६०,९३५ मते मिळवत काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांच्यावर ४,२८४ मतांची आघाडी घेतली होती. वंजारी यांना ५६,६५१ मते मिळाली, तर नितेश कराडे यांना २३,९८५ मते मिळाली.
मात्र, पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पुढील पसंतीच्या मतांची मोजणी निर्णायक ठरणार होती. नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाल्याचीही माहिती समोर आली. दुसरीकडे, मतमोजणी केंद्रावर भाजप आमदार प्रवीण दटके आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी एकमेकांची गळाभेट घेतल्याचे चित्रही पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या गृहप्रदेशातील या लढतीत मतमोजणीचे कल बदलत असल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष अंतिम निकालाकडे लागले होते. मात्र, मतमोजणीच्या टप्प्यातील आघाडी आणि अंतिम विजय यांत फरक असू शकतो. त्यामुळे अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतरच नागपूर पदवीधर मतदारसंघातील अंतिम चित्र स्पष्ट होईल.
निकालाकडे राजकीय पक्षांचे लक्ष
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील प्रतापसिंह पाटील यांची आघाडी आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील कौस्तुभ गावडे यांची कामगिरी या दोन्ही घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निकालांमधून स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांचे संकेत मिळू शकतात. मात्र, मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडून अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच विजयाचे चित्र स्पष्ट होईल.








