Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजकीय भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या अडीच दशकांपासून बिहारच्या राजकारणावर वर्चस्व राखणाऱ्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला आता आव्हाने वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बिहारमधील ‘नितीश राज’ संपणार असून नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागलं आहे.
नितीशकुमार यांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी सुरू
मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असल्याने बिहारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार आहेत. यावेळी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हेदेखील उपस्थित राहतील. नितीशकुमार यांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी सुरू आहे. या मोठ्या बदलावर सध्या पक्षात खलबते सुरू आहेत. जर नितीशकुमार दिल्लीच्या राजकारणाकडे वळले, तर बिहारमधील मुख्यमंत्रिपद रिक्त होईल आणि अशा स्थितीत भारतीय जनता पक्ष आपला मुख्यमंत्री नियुक्त करण्यासाठी सज्ज झाला आहे. असं म्हटलं तरी काही नवीन वाटायला नको. नितीश कुमार त्यांचा मुलगा निशांत कुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपवतील आणि मुख्यमंत्रिपद भाजपाला देतील अशी राजकीय चर्चा सुरू आहे. भाजप सध्या युतीतील सर्वात मोठी शक्ती असल्याने, मुख्यमंत्रिपदावरचा त्यांचा दावा नैसर्गिक मानला जात आहे. यामुळे बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होण्याची शक्यता बळावली आहे.
मोठा प्रशासकीय राजकीय बदल घडण्याचे संकेत
2026 च्या राज्यसभा निवडणुका आणि सत्तेचे समीकरण पाहील तर 2026 मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांदरम्यान मोठा प्रशासकीय राजकीय बदल घडण्याचे संकेत मिळतायेत. सध्या संयुक्त जनता दल JDU आणि भाजपचे उच्च नेतृत्व या उत्तराधिकार योजना भविष्यातील रणनीतीवर गंभीरपणे विचारमंथन करतायत. युतीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप आता बिहारच्या सत्तेवर आपला थेट दावा सांगण्याच्या तयारीत असून, यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांना एक नवीन वळण मिळालय.
२ दशकाहून अधिक काळ माझ्यावर लोकांनी विश्वास ठेवला
नितीश कुमार यांनी ट्विट करून राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. नितीश कुमार म्हणाले की, मागील २ दशकाहून अधिक काळ माझ्यावर लोकांनी विश्वास ठेवला, माझ्यासोबत उभे राहिले. त्याच जोरावर मी बिहारच्या लोकांची सेवा केली. तुमचा विश्वास आणि पाठिंबा यावर बिहार आज विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. संसदीय जीवनाची सुरुवात करताना माझ्या मनात एक इच्छा होती. बिहारच्या विधिमंडळासोबत मला संसदेतील दोन्ही सभागृहाचा सदस्य व्हायचे होते. त्यामुळे यंदा होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मी सदस्य बनू इच्छितो, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच मी पूर्ण प्रामाणिकपणे विश्वासही देतो, तुमच्याशी भविष्यातही तितकाच संबंध कायम ठेवेन. तुमच्या साथीने विकसित बिहार बनवण्याचा संकल्प कायम आहे. राज्यात जे नवे सरकार बनेल त्यांना माझा पाठिंबा आणि मार्गदर्शन देत राहीन असा विश्वासही नितीश कुमार यांनी व्यक्त केला आहे.
१० वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा त्यांचा रेकॉर्ड
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर २० नोव्हेंबरला नितीश कुमार यांनी पटना येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. बिहारमध्ये १० वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. बिहारमध्ये दीर्घ काळ त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवले. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र आता ४ महिन्यानंतर बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होत असल्याचे दिसते. ४ महिन्यातच मुख्यमंत्री नितीश कुमार राजीनामा देऊन राज्यसभेवर जात असल्याची घटना आहे. बिहारच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवता येतीय. जर ते राज्यसभेवर गेले, तर बिहारमध्ये पुढील मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत…त्यामुळे बिहारमधील राजकीय घडामोडींनाही वेग आलाय.
भाजपकडून बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार दावा
नितीशकुमार यांच्या राज्यसभेच्या नामांकनाच्या वृत्तामुळे बिहारचा नवा प्रभारी कोण असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, जर नितीशकुमार यांनी केंद्रात मंत्रिपद किंवा महत्त्वाची भूमिका स्वीकारली, तर भाजप बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार दावा करेल.












