Nishant Kumar | बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) कालचा (14 एप्रिल) दिवस खूप महत्त्वाचा दिवस ठरला. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर एनडीएच्या आमदारांनी भाजप नेते सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी म्हणून निवड केली. तर आज सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. मागील काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार याबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. तर बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार (Nishant Kumar) यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत होती. मात्र, शेवटच्या क्षणी निशांत कुमार हे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता संपुष्टात आली. असं म्हटलं जात आहे की, निशांत कुमार यांनी स्वतः हे पद नाकारले आहे.
हेही वाचा – पंजाबमध्ये भीषण अपघात! बस थेट दरीत कोसळली, 5 जणांचा जागीच मृत्यू
निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड का केली नाही?
निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड का झाली नाही? याबाबत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तेज प्रताप यादव म्हणाले की, निशांत कुमार यांना मंत्रिमंडळातील पदासाठी जास्त अनुभव नाहीये. जरी ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरीपण सत्य हे आहे की राजकारणात अनुभवाला महत्त्व आहे. जेव्हा निशांत कुमार यांना पुरेसा अनुभव मिळेल तेव्हा त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, असं तेज प्रताप यादव यांनी सांगितलं.
जेडीयूच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, बिहारमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी दोन अनुभवी नावांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी फक्त तीनच जण शपथ घेतील. तसेच नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले जेडीयूचे बिजेंद्र प्रसाद यादव आणि विजय कुमार चौधरी हे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील सध्याच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल.
निशांत कुमार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्याच्या संदर्भात जेडीयू नेते श्रवण कुमार म्हणाले की, पक्षाचे कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त करत आहेत. नेतेही त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, निशांत कुमार स्वतः उपमुख्यमंत्री पदासाठी तयार नाहीत. त्यांना कोणत्याही पदापेक्षा पक्ष मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे, असं श्रवण कुमार यांनी सांगितलं.










