SSC Maths Paper Leak | सध्या राज्यात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा (SSC Board Exam 2026) सुरू आहेत. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान गणित विषयाचा पेपर लीक (SSC Maths Paper Leak) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेच्या तीन दिवस आधी सोशल मीडियावर गणिताचा पेपर फुटल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – राजकारणात खळबळ! एकनाथ खडसे अडचणीत; एसआयटी करणार चौकशी, बावनकुळे अॅक्शन मोडमध्ये
गणितासारखा महत्त्वाच्या विषयाचा पेपर सोशल मीडियावर लीक झाला आहे. या प्रकरणाची दखल पुणे विभागीय शिक्षण मंडळाने घेतली असून याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणामुळे आता विद्यार्थ्यांना गणिताचा पेपर पुन्हा द्यावा लागणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
सोशल मीडियावर पेपर कधी झाला लीक?
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान गणित भाग 1 आणि गणित भाग 2 या दोन्ही विषयांचा पेपर फुटला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. टेलिग्राम अॅपवर या विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी प्रसारित करण्यात आल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे, गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका पेपरच्या काही तास आधी नाही तर तीन दिवस आधी लीक झाल्या होत्या. या संशयस्पद प्रकाराची माहिती पुणे विभागीय मंडळाला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कसून तपास केला तर या तपासादरम्यान त्यांना प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका आणि टेलिग्रामवर आलेली प्रश्नपत्रिका एकसारखीच असल्याचं दिसून आलं.
पुणे विभागीय मंडळानं काय दिली माहिती?
या प्रकरणी पुणे विभागीय मंडळाचे सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर यांनी शिवाजीनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गणित भाग 1 चा पेपर 6 मार्च रोजी झाला तर हा पेपर 5 मार्च रोजी टेलिग्रामवर लीक करण्यात आला होता. तर गणित भाग 2 चा पेपर तीन दिवस आधीच म्हणजेच 6 मार्च रोजी लीक करण्यात आला होता. हा पेपर 9 मार्च रोजी झाला होता.
पेपर लीक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण मंडळाने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तर या तक्रारीवरून आता पोलिसांनी टेलिग्राम ग्रुपचे अॅडमिन आणि इतर सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस आता प्रश्नपत्रिका कोणाच्या माध्यमातून लीक झाली या कसून तपास करत आहेत.
दरम्यान, पेपर लीक झाल्याच्या या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आता गणिताचा लीक झालेला पेपर पुन्हा द्यावा लागणार का? असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे.





