Iran Attack On Dubai International Airport | अमेरिका (US) आणि इस्त्रायने (Israel) केलेल्या हल्ल्यानंतर इराण ज्या देशांमध्ये अमेरिकेचे तळ आहेत त्या देशांना लक्ष्य करताना दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच इराणने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dubai International Airport) हल्ला केला होता. ज्यामध्ये दुबई विमानतळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर आता पुन्हा एकदा इराणने काही वेळापूर्वी दुबई विमानतळावर ड्रोन हल्ला (Drone Attack) केला आहे.
हेही वाचा – गॅस तुटवड्याच्या मुद्यावर सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाल्या, “ही वेळ राजकारण करण्याची…”
इराणकडून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ला
आज इराणकडून दुबई विमानतळावर मोठा ड्रोन हल्ला करण्यात आला. या ड्रोन हल्ल्यानंतर दुबईकडून मोठी पाऊल उचलण्यात आली. यावेळी दुबईमध्ये 19 भारतीय नागरिकांना अटक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भारतीय नागरिकांना का केली अटक?
दुबई विमानतळावर ड्रोन हल्ला झाल्यानंतर सोशल मीडियावर काही फेक व्हिडीओ शेअर करण्यात आले. हे फेक व्हिडीओ शेअर करण्याच्या आरोपाखाली दुबईमधील 35 जणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या 35 जणांमध्ये 19 भारतीय नागरिक असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ज्या 35 नागरिकांना अटक करण्यात आली आहे त्यांना लगेचच कोर्टात दाखल केले जाणार आहे. अटक केलेल्यांमध्ये 35 लोक विविध देशांचे आहेत, ज्यामध्ये 19 भारतीय नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती यूएईच्या डब्ल्यूएएमने दिली आहे.
35 नागरिकांवर करण्यात आलेली कारवाई ही डिजिटल पडताळणीनंतर करण्यात आली आहे. ही कारवाई खोटी माहिती पसरवणाऱ्या लोकांवर करण्यात आली आहे. या लोकांनी एआयच्या मदतीने व्हिडीओ तयार केले होते आणि सोशल मीडियावर व्हायरल केले होते, अशी माहिती देखील समोर आली.
दरम्यान, इराणने दुबई विमानतळावर केलेल्या हल्ल्यानंतर काही वेळाकरिता उड्डाणे थांबवण्यात आली आहे. विमानतळावरील प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
दुबईच्या मीडिया ऑफिसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (Twitter) वर दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन घटनेमुळे विमानतळाजवळील इंधनाच्या एका टाकीला धक्का बसला आणि त्यानंतर आग लागली. काही वेळातच बचाव पथकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
आखाती प्रदेशातील वाढता संघर्ष आता दुबईसारख्या महत्वाच्या शहरांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसत आहे. सोमवारी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली आणि आकाशात काळ्या धुरांचे मोठ- मोठे लोट दिसले. सुरक्षा कारणास्तव त्वरित आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली असून विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली.












