village self reliant gas shortage solution : आखाती देशातील युद्धामुळे (Gulf War) सध्या जगभर इंधनाचे दर भडकले आहेत. भारतातही याचे पडसाद उमटत असून, गॅस सिलेंडरसाठी (Gas Cylinder Shortage) पहाटेपासून रांगा आणि पोलिसांच्या बंदोबस्तात होणारे वितरण असं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, अशाही परिस्थितीत भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) एका गावाने स्वतःची ऊर्जेची गरज स्वतःच भागवली आहे. ‘बायोगॅस’च्या (Biogas Production) माध्यमातून हे गाव कसं आत्मनिर्भर झालंय.
हेही वाचा – मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क ₹10 ने कमी; इंधन स्वस्त होणार का? जाणून घ्या नवीन दर
गॅस सिलेंडरच्या किमती गगनाला भिडल्या
जगभरात युद्धाचे ढग दाटले आहेत आणि त्याचे परिणाम थेट सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत पोहोचलेत. गॅस सिलेंडरच्या किमती गगनाला भिडल्यात, तर दुसरीकडे सिलेंडर मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. पण याच संकटकाळात भंडाऱ्यातल्या एका गावानं जगाला नवी दिशा दाखवली आहे.
‘रेंगेपार कोहळी’ हे २ हजार लोकवस्तीचं गाव
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील ‘रेंगेपार कोहळी’ हे २ हजार लोकवस्तीचं गाव. या गावात ना गॅससाठी चिंता आहे, ना रांगा… आणि ना सरपणासाठी जंगलतोड करण्याची वेळ आली आहे. याचं कारण म्हणजे या गावातील सुमारे २०० कुटुंबांनी उभारलेले ‘बायोगॅस’ आणि ‘गोबरगॅस’ प्रकल्प.
शेणापासून या गावात गॅसची निर्मिती
गावात घराघरात दुधाळ जनावरे आहेत. त्यांच्या शेणापासून या गावात गॅसची निर्मिती केली जातेय. ज्यावेळी इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय, तेव्हा या गावानं पारंपरिक ऊर्जेचा वापर करून स्वतःला ‘आत्मनिर्भर’ बनवलंय.
उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापरली जातेय
केवळ इंधनच नाही, तर बायोगॅसमधून निघणारी ‘स्लरी’ शेतीसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापरली जातेय. यामुळे रासायनिक खतांचा खर्चही वाचला आहे. रेंगेपार कोहळीच्या या ‘ऊर्जा मॉडेल’ची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होत आहे.












