Pakistani Embassy Blast In Tehran | इराणची (Iran) राजधानी तेहराण (Tehran) येथे भीषण बॉम्बस्फोट (Bomb Blast) झाल्याची घटना घडली आहे. यामुळे तेहराणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तेहराण येथील पाकिस्तानी दुतावास आणि तिथे तैनात असलेल्या राजदुताच्या घराजवळ मोठा शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तेहराणमधील पाकिस्तानी दुतवासाजवळ झाला भीषण बॉम्बस्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, तेहराणमधील पाकिस्तानी दुतवासा शेजारीच हा भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या हल्ल्यात सुदैवानं पाकिस्तानचा राजदूत बचावला आहे. तर इतर कर्मचारी देखील सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. हा बॉम्बस्फोट गुरूवारी (26 मार्च) रात्री 8 च्या सुमारास झाला होता. हा हल्ला पाकिस्तानचे दुतावास आणि राजदूताच्या बंगल्याशेजारीच झाला आहे. त्यामुळे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कुटुंबिय आणि कर्मचारी यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.
या हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाल्याची किंवा कोणी जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. तसेच पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत शांततेसाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच अचानक हा हल्ला झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
पाकिस्तानच्या जीईओ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी दुतावासाशेजारीच इराणचे लष्करी दलाचे एक ठिकाण आहे. त्यामुळे इराणच्या लष्करी दलाच्या या ठिकाणाला टार्गेट करत असताना ते चुकलं आणि पाकिस्तानी दुतावासाशेजारी हल्ला झाला. तर हा हल्ला अत्यंत मोठा होता. हा बॉम्ब हल्ला झाल्यानंतर मोठा आवाज झाला होता. मात्र, या हल्ल्यात दुतावास किंवा कर्मचाऱ्यांच्या घरांना कोणतेही नुकसान झालेले नाहीये.












