Baramati election uncontested update : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. पोट निवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. बारामती विधानसभेची पोट निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.
राष्ट्रीय पक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक
आम्ही बारामती विधानसभा पोट निवडणूक लढणार आहोत. यासाठी योग्य वेळी उमेदवार जाहीर करणार आहोत. अनेक पक्ष आमच्या संपर्कात आहेत. यामध्ये काही राष्ट्रीय पक्ष सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अनेक पक्षांशी चर्चा सुरू आहेत. काहीही झालं तरी बारामतीची निवडणूक लढणार आहोत, निवडणुकीबाबत बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
मागील पोटनिवडणूकांची हाकेंकडून आठवण
‘महाराष्ट्रात याआधीही अनेक वेळा एखाद्या नेत्याच निधन झालं तर त्या ठिकाणी पोटनिवडणुका झालेल्या आहेत. रमेश वांजळे यांच्या निधनानंतर पोट निवडणुकीत भाजपाने त्या ठिकाणी उमेदवारी देऊन निवडणूक जिंकली आहे. पिंपरी चिंचवडचे नेते लक्ष्मण जगताप यांचा अकाली निधन झाल्यानंतर. त्या ठिकाणी लक्ष्मण जगताप यांच्या उमेदवाराच्या विरोधात अजित पवार यांनी उमेदवार उभा केला होता. त्यामुळे लोकशाही टिकायची असेल तर निवडणुका व्हाव्या लागतात. अशा प्रसंगाचे कारण सांगून निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या तर ते लोकशाहीसाठी घातक आहे,’
असे हाके म्हणाले.
दोन दिवसात आम्ही उमेदवार जाहीर करू
‘आरक्षणाचा मुडदा पाडला जात असताना, आम्ही रस्त्यावर भांडणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही लोकशाहीमध्ये निवडणुकीला सामोरे जाऊ. शेवटी जनता ठरवेल. आमची मतं योग्य की अयोग्य. आमची निवडणूक योग्य की अयोग्य. येत्या दोन दिवसात उमेदवार कोण असेल हे आम्ही जाहीर करू. आम्ही सर्वांच्या संपर्कात आहोत. बारामतीची निवडणूक ताकतीने लढवणार आहोत,’ हाके म्हणाले.
तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली – हाके
‘दादांच्या सहानुभूतीवर सुनेत्रा पवारांना तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पद दिले आहे. हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप असणाऱ्या पार्थ पवार यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवले आहे. शरद पवार यांनाही बिनविरोध राज्यसभेवर पाठवलेल आहे. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधान परिषदेवर घेण्यात यावं आणि भाजपा सत्ताधाऱ्यांनी त्यांचा एक कार्यकर्ता निवडणुकीला उभा करावा. आप, बसपा, काँग्रेस, सत्तेमधील पक्ष आहेत. डायरेक्ट इन डायरेक्ट ते आमच्याशी सहमत आहेत. बारामतीत ओबीसींनी मनावर घेतलं तर पुढच्या पार्टीचे डिपॉझिट जप्त होऊ शकते,’ असे ओबीसी नेते
लक्ष्मण हाके पुढे बोलताना म्हणाले. त्यामुळे बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे.












