Indonesia Earthquake | इंडोनेशियामध्ये (Indonesia) निसर्गाने रौद्ररूप धारण केले आहे. आज पहाटे इंडोनेशियातील उत्तर मोलुक्का समुद्रात 7.4 तीव्रतेचा मोठा भूकंप (Earthquake) झाला. तर या भीषण भूकंपानंतर समुद्रात त्सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण इंडोनेशिया हादरले आहे. या नैसर्गिक आपत्तीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – “होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली नाही तर थेट…”, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली थेट धमकी, दिला मोठा इशारा
इंडोनेशियात भूकंप-त्सुनामीचा दुहेरी तडाखा
आज पहाटे उत्तर मोलुक्का समुद्रात 7.4 रिश्टर स्केलचा भीषण भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के इतके जोरात होते की अचानक जमीन हलू लागली होती. त्यामुळे तेथील परिसरातील नागरिक जीवाच्या आकांताने घराबाहेर पळाले. तसेच या भूकंपानंतर सुमद्रात त्सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने किनारी भागात हाय अलर्ट जारी केला आहे. तर या नैसर्गिक आपत्तीत एकाचा मृत्यू झाला असून सध्या बचावकार्य सुरू आहे.
या शक्तिशाली भूकंपामुळे आणि त्सुनामीच्या फटक्यामुळे अनेक घरांचे आणि इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सध्या इंडोनेशियाची शोध आणि बचाव पथक बाधित भागामध्ये पोहचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. तसेच बचावकार्य देखील सुरू केले आहे. किनारपट्टीवर जे लोक राहत आहेत त्यांना उंचावर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भूकंपामुळे इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि मलेशियाच्या किनारपट्टीवर धोकादायक लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तैवान, मलेशिया, फिलीपिन्स आणि पापुआ न्यू गिनीला पॅसिफिक सुनामी चेतावणी केंद्राने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.












