Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) ढोंगीबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच त्याने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे, अनेक शेतकऱ्यांच्या जमीन-जुमला लुबाडल्या असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अशोक खरातला अटक केली आहे. तर आता या प्रकरणात आणखी एक नवा खुलासा झाला आहे, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
हेही वाचा – युद्धबंदीनंतरही तणाव कायम! इस्रायलचा बेरूतवर भीषण बॉम्बहल्ला; 112 ठार, 800 हून अधिक जखमी
अशोक खरातने आणि कल्पना खरातने एका कुटुंबाची केली मोठी फसवणूक
मागील काही दिवसांपासून अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही फरार आहे. सध्या पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपली पथके रवाना केली असून कल्पना खरातचा शोध घेत आहेत. अशातच आता अशोक खरात आणि कल्पना खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण कल्पना खरातने आणि अशोक खरातने मिळून एका कुटुंबाला लाखोंचा गंडा घालत त्यांची जमीन लुबाडली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील माळी कुटुंबाला अशोक खरातने आणि कल्पना खरातने आपल्या जाळ्यात ओढले होते. तुमच्या घरावर मोठे संकट आहे, असं सागून माळी कुटुंबाचा विश्वास खरातने आणि त्याच्या पत्नीने संपादन केला. त्यानंतर त्यांच्या मालकीची 16 एकर जमीन ही त्यांच्यासाठी अपशकुनी असल्याचं खरातने सांगितलं. तसेच जर तुम्ही ही जमीन विकली नाही तर कुटुंबातील चार भावांपैकी एका भावाचा मृत्यू होईल, असं सांगून खरातने आणि कल्पना खरातने माळी कुटुंबात भीती निर्माण केली होती.
मृत्यूच्या भीतीपोटी माळी कुटुंबाने आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी 16 एकर जमीन विकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खरातने या गोष्टीचा फायदा घेत ती जमीन अत्यंत नाममात्र दारत विकत घेत स्वत:च्या नावावर करून घेतली. त्यानंतर आपली जमीन गेल्यानंतर माळी कुटुंब हे उघड्यावर आले. तर खरातने हडपलेल्या या जमिनीवर ईशानेश्वर मंदिर उभारले जेणेकरून तो भाविकांना आकर्षित करून आपला ढोंगीपणा सुरू ठेवू शकेल. तर बाकीच्या जागेत त्याने स्वत:साठी एक भव्य असे फार्महाऊस बांधले.
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच माळी कुटुंबाने पोलीस स्थानकात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तर या तक्रारीची दखल घेत सिन्नर पोलिसांनी अशोक खरात आणि कल्पना खरातवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांच्या कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.












