Laura Cardoso : ब्राझील महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू लॉरा कार्डोसोनं एका टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 9 बळी घेऊन इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी पुरुष किंवा महिलांच्या कोणत्याही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अशी कामगिरी झाली नव्हती. लेसोथोविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कार्डोसोनं केवळ 3 षटकांत 4 धावा देऊन 9 बळी घेतले आणि ब्राझीलला 189 धावांनी मोठा विजय मिळवून दिला.
लॉरा कार्डोसोनं 9 बळी घेऊन रचला इतिहास :
या सामन्यात ब्राझीलनं प्रथम फलंदाजी करत 202 धावा केल्या. रॉबर्टा एव्हरीनं संघासाठी 35 चेंडूंमध्ये 48 धावा केल्या, तर मोनिक मचाडोनं 41 चेंडूंमध्ये नाबाद 69 धावा केल्या. त्यानंतर लॉरा कार्डोसोनं गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत दुसऱ्याच षटकात हॅट-ट्रिक घेतली आणि लेसोथोला बॅकफूटवर ढकललं. त्यानंतर कार्डोसोनं एकापाठोपाठ एक बळी घेत चौथ्या षटकात एकही धाव न देता चार बळी घेतले. ती तिथंच थांबली नाही, सहाव्या षटकात आणखी दोन बळी घेऊन तिनं सामना संपवला. तिनं तीन षटकांत नऊ बळी घेत लेसोथोला केवळ चार धावा दिल्या आणि संपूर्ण संघ अवघ्या 13 धावांत सर्वबाद झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नऊ बळी घेऊन कार्डोसोने विक्रमांच्या पुस्तकात आपलं नाव कोरलं आहे.
सोनम येशेचा विश्वविक्रम मोडला :
यापूर्वी, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम भूतानच्या सोनम येशेच्या नावावर होता. येशेनं 26 डिसेंबर 2025 रोजी गेलेफू इथं म्यानमारविरुद्धच्या सामन्यात केवळ 7 धावांत 8 बळी घेतले, जो आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम होता. महिलांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, विशेषतः दोन पूर्ण-सदस्य (कसोटी खेळणारे देश) यांच्यातील सामन्यांमध्ये, हा विक्रम न्यूझीलंडची फिरकी गोलंदाज एमी सॅटरथवेटच्या नावावर आहे. तिनं 16 ऑगस्ट 2007 रोजी टॉन्टन इथं इंग्लंडविरुद्ध 4 षटकांत 17 धावांत 6 बळी घेतले होते.
पुरुषांमध्ये कोणाच्या नावावर विक्रम :
पुरुषांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, भारताचा दीपक चहर या यादीत अव्वल स्थानी आहे. त्यानं 10 नोव्हेंबर 2019 रोजी नागपूर इथं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केवळ 7 धावांत 6 बळी घेतले होते. पण आता कार्डोसोनं एका टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 9 बळी घेऊन सर्वांना मागे टाकलं आहे.






