Manisha Mhaiskar Breaking News: राज्याच्या वरिष्ठ IAS अधिकारी मनीषा म्हैसकर (Manisha Mhaiskar) यांनी एका मुलाखतीत मांडलेल्या अनुभवामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी असा दावा केला आहे की २०२३ मध्ये मंत्रिमंडळ स्थापनेनंतर एका नेत्याने “माझा विभाग सांभाळण्यासाठी महिला सचिव नको” अशी भूमिका घेतली होती.
दिल्ली येथे आयोजित महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनाच्या स्मरणिकेत प्रकाशित झालेल्या मुलाखतीत राज्याच्या वरिष्ठ IAS अधिकारी मनीषा म्हैसकर (Manisha Mhaiskar) यांनी हा अनुभव सांगितला. या विधानानंतर प्रशासनातील लिंगभेदाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा: मराठवाडा हादरला! परभणी, हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के
म्हैसकर यांनी सांगितले की, त्यांच्या ३३ वर्षाच्या सेवाकाळात हा एकमेव असा अनुभव होता, जिथे त्यांच्या लिंगावरून निर्णय घेतला गेल्याचे जाणवले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर विभाग वाटपाच्या प्रक्रियेत एका वरिष्ठ राजकीय नेत्याने महिला अधिकाऱ्याला त्या पदावर नको असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी हा प्रसंग “धक्कादायक” असल्याचे म्हटले.
प्रशासनाबाबत मत
त्यांनी हेही स्पष्ट केले की, आजच्या काळात महिला आणि पुरुष आधिकाऱ्यांमध्ये कामाच्या क्षमतेच्या दृष्टीने कोणताही फरक नसतो. वेळ व्यवस्थापन, टीमवर्क आणि नेतृत्व कौशल्य हेच प्रशासकीय यशाचे खरे मापदंड असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकीय चर्चेला सुरुवात
या वक्तव्यानंतर संबंधित मंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका झाल्याची चर्चा प्रशासन आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.












