Sunetra Pawar | सध्या महाराष्ट्रात बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहे. या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत. एकिकडे सर्वांना या पोटनिवडणुकीचे वेध लागले असतानाच दुसरीकडे आता पुणे महापालिका प्रशासनाने केलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. याबाबत सुनेत्रा पवारा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा – दिल्ली पुन्हा हादरली! आधी धावत्या कारमध्ये महिलेवर केला बलात्कार अन् नंतर…, धक्कादायक घटनेनं खळबळ
सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे नेमकी काय केली तक्रार?
क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेवरून सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीले आहे. या पत्रात सुनेत्रा पवारांनी अनेक गंभीर आरोप केले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुणे महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर प्रशासनाकडून 15 क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली आहे. मात्र, पुनर्रचना करताना नागरिकांच्या सोयींपेक्षा राजकीय सोयांना प्रशासनाने जास्त महत्त्व दिलं असल्याचा आरोप सुनेत्रा पवारांनी केला आहे. सुनेत्रा पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, सध्या क्षेत्रीय कार्यालयांच्या सीमांमध्ये जो बदल केला आहे त्या बदलांमुळे स्थानिक लोकांना दैनंदिन कामकाजासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांची ही पुनर्रचना तांत्रिक निकषांवर आधारित नसून ती दिशाहीन आहे, अशी तक्रार सुनेत्रा पवारांनी केली आहे.
पुढे सुनेत्रा पवारांनी काही गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, क्षेत्रीय कार्यालयांच्या या पुनर्रचनेत सर्वात मोठा फटका बसला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. या नवीन पुनर्रचनेमुळे शहरातील एकूण 15 पैकी 14 क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समित्यांवर भाजप पक्षाचे निर्विवाद वर्चस्व निर्माण होणार आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वाट्याला फक्त एक प्रभाग समिती आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेत संख्याबळ दुसऱ्या क्रमांकाचे असताना देखील त्यांना सत्तेच्या प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यासाठी प्रशासनाचा वापर करून राजकीय हस्तक्षेप केला जात आहे, असे गंभीर आरोप सुनेत्रा पवारांनी केले आहेत.
सुनेत्रा पवारांनी केलेल्या या तक्रारीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी तातडीनं या दखल घेत नगर विकास विभागाला तातडीनं हालचाली करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच फडणवीसांनी महापालिका आयुक्तांकडून क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेचा सविस्तर अहवाल मागवला असून या अहवालाची सविस्तर तपासणी केली जाणार आहे.












