HIV Death Allegation Hospital Controversy : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून (Sindhudurg Crime) एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. वडिलांच्या मृत्यूनंतर तब्बल चार वर्षांनी मुलाला कळतं की त्यांच्या वडिलांवर HIV चा उपचार (HIV Treatment) सुरू होता, आणि विशेष म्हणजे याबाबत संपूर्ण कुटुंबाला अंधारात ठेवण्यात आलं होत. वैद्यकीय गोपनीयता (Medical Confidentiality) आणि कुटुंबाची जबाबदारी यामध्ये समतोल राखण्यात मोठं अपयश आलं का? याच प्रश्नांवर आता आरोग्य यंत्रणेवर बोट (Questions Raised Over the Healthcare System) ठेवलं जातंय.
हेही वाचा – जरांगे पुन्हा आक्रमक! मराठा उपसमितीवर टीका करत दिला आंदोलनाचा इशारा..
“कुडाळ तालुक्यातील महेश राणे यांच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुमारे १५ दिवस उपचार सुरू होते. डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत आणि त्यांना ब्रेन स्ट्रोकही आला आहे. प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत गेल्याने पुढील उपचारासाठी त्यांना गोवा बांबोळी येथील GMC रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी आणि इतर तपासण्या करण्यात आल्या. मात्र, उपचार सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, आणि त्याच करण ठरलं किडनी फेल आणि ब्रेन स्ट्रोक…
मृत व्यक्तीच्या बॅगेत सापडलेल्या HIV गोळ्या
मृत्यूनंतर कुटुंबीयांनी सर्व विधी पूर्ण केले. पण काही दिवसांनी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. मृत व्यक्तीच्या बॅगेत सापडलेल्या काही गोळ्यांचा तपास केला असता त्या HIV च्या उपचारासाठी असल्याचं निष्पन्न झालं. ही बाब समोर येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. कारण २०२२ पासून उपचार सुरू असूनही कुटुंबाला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.
पतीचा जीव घेऊन अनुदान लाटल्याचा पत्नीचा आरोप
कुटुंबीयांच्या मते, जर योग्य वेळी माहिती देण्यात आली असती, तर रुग्णाची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेता आली असती. तसेच, कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणीही वेळेत झाली असती. दरम्यान, या प्रकरणात २०२२ साली म्हापण गावात झालेल्या एका आरोग्य कॅम्पचा धागा समोर येत आहे. या कॅम्पमध्येच प्राथमिक तपासण्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, असे कॅम्प सरकारी आरोग्य केंद्रात होणं अपेक्षित असताना ते खाजगी ठिकाणी का झाले? याबाबतही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “माझ्या नशिबातील असणारे दागिने, जमीन विकली असती त्या फाउंडेशनला. पण एखाद्या फाउंडेशनने माझ्या पतीचा जीव घेऊन अनुदान लुटायला नको होतं. आज माझी मुलं वाऱ्यावर आली, नाहक बदनामी झाली. आम्हाला न्याय हवाय,” अशी आर्त हाक त्यांच्या पत्नीनं दिलीय.
एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी
मृतांचा मुलगा महेश राणे यांनी या संपूर्ण प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. संबंधित फाउंडेशन, संबंधित रुग्णालय, काउन्सिलर आणि लॅब टेक्निशियन यांची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. आणि आवश्यक असल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.”
दोषींवर कारवाई होणार का? याकडे लक्ष
याबाबत वैद्यकीय प्रशासनाशी चर्चा केली असता त्यांनी यायाबाबत चौकशी सुरु असून लवकरच याचा अहवाल प्राप्त होणार असल्याचे सांगितले. तसेच प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “रुग्णाची गोपनीयता जपणं जितकं महत्त्वाचं आहे. तितकंच कुटुंबाची सुरक्षितता आणि माहिती देणंही आवश्यक आहे. या प्रकरणात नेमकी चूक कुठे झाली? आणि दोषींवर कारवाई होणार का? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.












