Solapur ZP Election: मोठ्या राजकीय घडामोडीनंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या (झेडपी) विषय समित्यांचे एकूण 83 सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील दोन सदस्यांच्या नाट्यमय घडामोडीनंतर निर्माण झालेला तणाव अखेर मिटल्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
सोलापूर | शिवाजी सावंत
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या उपस्थितीत आज बुधवार १५ एप्रिल २०२६ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विषय समित्यांच्या सदस्यपदांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. ठरल्याप्रमाणे भाजप व मित्रपक्षांच्या सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र अक्कलकोटमधील शिंदे गटाच्या दोन सदस्यांनी सुरुवातीला काही समित्यांसाठी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
शिवराज म्हेत्रे आणि प्रवीण तानवडे यांनी आपली नावे यादीत नसल्याने समाजकल्याण, शिक्षण, अर्थ आणि बांधकाम समित्यांसाठी अर्ज दाखल करत बंडखोरीची भूमिका घेतली होती. यामुळे सभेत काही काळ तणाव निर्माण झाला आणि सभा तहकूब होण्याची परिस्थिती निर्माण झाली.
हेही वाचा: नाशिकमध्ये मोठी खळबळ! TCS शाखेतील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप; FIR मधून नेमकं काय समोर आलं?
या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने हालचाली करत संबंधित सदस्यांशी चर्चा केली. बालाजी सरोवर येथे झालेल्या बैठकीत समजूत काढण्यात आली आणि दोन्ही सदस्यांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपले अर्ज मागे घेतले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीमुळे हा तिढा सुटल्याचे सांगितले जात आहे. यानंतर दुपारी साडेतीन वाजता विशेष सभा पुन्हा घेण्यात आली आणि निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पाटील यांनी सर्व विषय समित्यांचे सदस्य बिनविरोध निवडले असल्याचे घोषित केले.
पडद्यामागील घडामोडी
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने शिंदे गट, अजित पवार गट तसेच शरद पवार गटातील काही सदस्यांना संधी दिली होती. मात्र सुरुवातीला नाव नसल्याने काही सदस्य नाराज झाले आणि अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करत तडजोडीचा मार्ग स्वीकारला.
समितीनिहाय निवड झालेले सदस्य
स्थायी समिती: पृथ्वीराज माने, शांभवी कल्याणशेट्टी, आदिनाथ देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे, दादासाहेब लवटे, सविता उंबरजे, रमेश भांजे
जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती: सिद्धाराम शिवमुती, गीतांजली साळुंखे, नंदकुमार काळे, रश्मी हिप्परगी, षण्मुखी कोरके, वंदना कांबळे
शिक्षण समिती: चंद्रकांत जाधव, सोनाली बोधले, सुषमा नारनवर, दिपाली ताड, श्रुती भोरगुंडे, विजयराज डोंगरे, शिवराज म्हेत्रे
आरोग्य समिती: सोनाली कडते, संगीता दुधाळ, संदीप टेळे, मीनाक्षी रोंगे, शोभा खटकाळे, नागनाथ भोसले
अर्थ समिती: प्रवीण तानवडे, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, पृथ्वीराज सावंत, लखन शिंदे, केरबा पांढरे यांच्यासह इतर सदस्य
बांधकाम, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन आणि समाजकल्याण समित्यांमध्येही सदस्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे जिल्हा परिषदेत बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासनावरील ताण कमी झाल्याचे मानले जात आहे.










