Maharashtra Heatwave 2026: महाराष्ट्रात एप्रिलच्या मध्यातच तीव्र उष्णतेची लाट जाणवत असून अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. अकोल्यात सर्वाधिक ४४.२ अंश तापमानाची नोंद झाली असून पुढील काही दिवस उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात मार्चच्या तुलनेत एप्रिल (April temperature) अधिक तापदायक ठरत असून उष्णतेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अकोला येथे बुधवारी ४४.२ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले. यासह विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील (Maharashtra heatwave) अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे.
या शहरांतही प्रचंड उष्णतेचा तडाखा
वाशिम (४२.६), अमरावती (४४), वर्धा (४३.९), नागपूर (४३.४), सोलापूर (४३.३), मालेगाव (४३.२) आणि बीड (४३.१) या शहरांतही प्रचंड उष्णतेचा तडाखा जाणवला. गोंदिया, परभणी, चंद्रपूर, यवतमाळ आणि बुलढाणा येथेही तापमान ४२ अंशांच्या आसपास राहिले.
दरम्यान, मुंबईत तापमान ३४ अंशांवर गेले असून किनारपट्टी भागातही उकाडा वाढला आहे. ठाणे येथे ३७ अंश तापमानाची नोंद झाली. कोल्हापूर (३९.६), नाशिक (३८.८) आणि नंदुरबार (३८.४) येथेही उष्णतेची तीव्रता वाढली आहे.
हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती कायम राहण्याचा इशारा दिला आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, पाणी पुरेसे प्यावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, अकोल्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे एका रिक्षाचालकाला भोवळ येऊन तो रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.






