Solapur: सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसासह झालेल्या विजांच्या कडकडाटात एक दुर्दैवी घटना घडली आहे. मोहोळ तालुक्यातील आढेगाव येथे वीज कोसळून ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (१७ एप्रिल) सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
राज्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट जाणवत असताना अचानक हवामानात बदल होऊन अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. सोलापूर जिल्ह्यातही संध्याकाळच्या सुमारास जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. उत्तर सोलापूर, बार्शी आणि मोहोळ या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली.
हेही वाचा: नाशिक SITचा मुंब्र्यात छापा; पती ताब्यात, तरीही निदा खान जाळ्यातून निसटली
याच दरम्यान, मोहोळ तालुक्यातील आढेगाव येथे विजय राजाराम डोंगरे हे त्यांच्या नव्या घराच्या बांधकामासाठी आलेली वाळू खाली करण्याचे काम करत होते. शुक्रवारी (१७ एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. याच वेळी विजांचा कडकडाट सुरू असताना अचानक वीज कोसळून विजय डोंगरे गंभीर जखमी झाले.
घटनेपूर्वी विजय यांनी त्यांच्या चुलत्याला फोन करून वाळूची गाडी आल्याची माहिती दिली होती आणि ती बांधकामाच्या ठिकाणी खाली करत असल्याचे सांगितले होते. काही वेळानंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन लागत नव्हता. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या नातेवाईकांकडून वीज कोसळल्याची माहिती मिळाली.
तत्काळ त्यांना मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर काम टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.






