Nashik IT Company Case: नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक छळ आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित निदा खान अद्याप फरार असून, SIT पथकाने मुंब्रा येथे धाड टाकली. मात्र ती पोलिसांच्या कारवाईपूर्वीच पसार झाली, तर तिचा पती मोईन खानला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
नाशिकमधील TCS च्या कंपनीत घडलेल्या लैंगिक छळ आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणात आता मोठी घडामोड समीर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान ही अद्याप फरार असून, नाशिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (SIT) ठाण्यातील मुंब्रा परिसरात धाड टाकून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हालचालींची माहिती मिळाल्याने ती आधीच तेथून पसार झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या १२ दिवसांपासून मुंब्रा येथील सासरी राहत होती. SIT पथक तिच्या मागावर होते आणि गेल्या चार दिवसांपासून मुंब्रा तसेच भिवंडी परिसरात गुप्त तपास सुरू होता. शुक्रवारी सकाळी सध्या वेशात काही अधिकारी तिच्या घरी पोहोचले आणि फिल्मी स्टाईलने रेकी करून कारवाईची तयारी केली. मात्र त्यावेळी घरात कोणीही आढळले नाही.
यानंतर पोलिसांनी तिचा पती मोईन खान (वय २७) याला त्याच्या कामाच्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी मुंब्रा पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, त्याच्याकडून निदा खानबाबत महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे. चौकशीतून निदाचे पूर्ण नाव ‘निदा मोईन नविद खान’ असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, निदा खान ही मुंबईतील मालाड येथील आयटी कंपनीत कार्यरत होती. या प्रकरणानंतर संबंधित कंपनीने तिला नोकरीवरून काढून टाकल्याची नोटीस दिली आहे. पती मोईन खानच्या म्हणण्यानुसार, निदाची मावशी तिला काही दिवसांपूर्वी नाशिकला घेऊन गेली आहे.
कोण आहे निदा खान?
निदा एजाज खान (वय २६) ही सॉफ्टवेअर इंजिनीअर असून २०२१ पासून कंपनीत कार्यरत होती. ती टीम लीडर म्हणून काम करत होती आणि नवीन महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी तिच्याकडे होती. तपासानुसार, कंपनीत नव्याने रुजू झालेल्या महिलांना लक्ष्य करून त्यांना जाळ्यात ओढण्यामध्ये तिची प्रमुख भूमिका असल्याचा आरोप आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात आर्थिक मदत आणि समन्वय करण्याचे कामही ती करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांच्या मते, निदा खान ही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून तिच्या अटकेनंतर संपूर्ण रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तिचे काही आंतरराष्ट्रीय संबंधही असू शकतात, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.
पुढील तपास
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक नाशिकमध्ये दाखल होणार आहे. हे पथक घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार असून, पीडित महिलांच्या तक्रारी थेट ऐकून घेणार आहे. तसेच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून माहिती घेऊन SIT तपासाची प्रगतीही तपासली जाणार आहे.
सध्या नाशिक पोलिसांची तीन पथके निदा खानच्या शोधात असून तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. तिच्या अटकेकडे संपूर्ण प्रकरणाच्या उकलची किल्ली म्हणून पाहिले जात आहे.











