Ajit Doval | अमेरिका (US) आणि इराण (Iran) या देशांमधील तणाव कमी होताना दिसत नाहीये. अजूनही या दोन्ही देशांकडून जोरदार हल्ले केले जात आहे. तर या युद्धामुळे बाकी अन्य देशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. अशातच आता मध्य पूर्वेतील भीषण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी रविवारी (19 एप्रिल) सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे.
हेही वाचा – भीषण दुर्घटना! जम्मूमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू
अजित डोवाल यांनी सौदी नेत्यांची घेतली भेट
अजित डोवाल हे रविवारी रियाध विमानतळावर दाखल झाले होते जिथे भारतीय राजदूत सुहेल खान आणि सौदी अरेबियाचे राजकीय व्यवहार उपमंत्री सौद अल-सती यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अजित डोवाल यांनी सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान, ऊर्जा मंत्री अब्दुलअजीज बिन सलमान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मुसैद अल-ऐबान यांची भेट घेतली. तर या भेटीदरम्यान अजित डोवाल आणि सौदीच्या नेत्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
नेमकी काय झाली चर्चा?
सौदी अरेबियाच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान, अजित डोवाल यांनी भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला. तसेच त्यांनी पश्चिम आशियातील संघर्ष आणि प्रादेशिक परिस्थितीसह परस्पर हिताच्या इतर मुद्द्यांवरही चर्चा केली.
या भेटीबाबत भारतीय दूतावासाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, या बैठकांदरम्यान दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक परिस्थिती आणि परस्पर हिताच्या इतर मुद्द्यांवर चर्चा केली आहे.
Hon’ble NSA Shri Ajit Doval paid an official visit to Riyadh on April 19.
He was received at the Airport by Ambassador Dr Suhel Khan and Deputy Minister for Political Affairs @KSAmofaEN H.E. Ambassador Dr. Saud Al-Sati.
Later, he had meetings with
Energy Minister H.R.H. Prince… pic.twitter.com/VTz7LJAOFu— India in Saudi Arabia (@IndianEmbRiyadh) April 19, 2026
दरम्यान, 11 आणि 12 एप्रिल रोजी पाकिस्तानात झालेली अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची पहिली फेरी कोणत्याही कराराशिवाय संपली होती. त्यानंतर आता मध्य पूर्वेतील संघर्ष सोडवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात या आठवड्यात पाकिस्तानामध्ये चर्चेची दुसरी फेरी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर या घडामोडींदरम्यान अजित डोवाल हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे आता भारत आपल्या मध्य-पूर्वेतील मित्र राष्ट्रांसोबत आपले सामरिक आणि द्विपक्षीय संबंध पुन्हा दृढ करत आहे. आखाती देशांमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यापासून ते द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यापर्यंत अनेक बाबी भारताच्या प्राधान्यक्रमात आहेत.












