Massajog Sarpanch Election : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती आणि राहूरी पोटनिवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला असून या निवडणूकीत रंगत आली आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात 16 सरपंच आणि 72 सदस्य अशा एकूण 88 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर ही जागा रिक्त झाली होती. मागील जवळपास दोन वर्षापासून मस्साजोक हे चर्चेचे केंद्रस्थान बनले आहे. मात्र, याठिकाणी सरपंच होणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्चिनी देशमुख या सरपंच पदासाठी निवडणूकीच्या रिंगणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला जनसंपर्क असलेले स्वरूपानंद देशमुख हे उभं राहिले आहेत. त्यामुळे हा सामना रंगला असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. स्वरूपानंद देशमुख यांच्यावर धनंजय मुंडे यांनी उभा केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाला त्यांना चोख प्रतिउत्तर दिले आहे.
गावासमोर नाक घासून अश्विनी देशमुखांना पाठिंबा द्यायला तयार
“मी कुणाच्या तरी सांगण्यावरून उभा राहिलोय किंवा मला कुणी तरी जाणूनबुजून उभं केलंय असं जरा जरी कुणाला जाणवलं तर मी साऱ्या गावासमोर नाक घासून अश्विनी देशमुखांना पाठिंबा द्यायला तयार आहे,” असं खुलं आव्हान त्यांनी दिलं आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज कायम ठेवत मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपवून टाकली. त्यामुळं अश्विनी देशमुख विरूद्ध स्वरूपानंद देशमुख या लढतीकडं आता साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय.
संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी यांचा निवडणूक लढण्याचा निर्णय
संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत असलेले त्यांचे बंधू धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबापैकी कुणी सदस्य ही निवडणूक लढवणार का अशी चर्चा सुरू झाली. ही जागा सर्वसाधारण जागेसाठी असल्यानं महिला किंवा पुरूष कुणीही उभं राहू शकतो. अखेर देशमुख कुटुंबानं संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांना निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आणि संतोष देशमुखांच्या कार्याच्या सन्मानासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, 7 ते 13 एप्रिल या अर्ज भरण्याच्या कालावधीत अनेकांनी या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होऊ लागली. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 17 एप्रिलला संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख, करुणा देशमुख यांनी आपापले अर्ज माघारी घेतले खरे पण स्वरूपानंद देशमुखांनी आपला अर्ज कायम ठेवत ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपवून टाकली.
संतोष देशमुख यांच्या न्यायिक लढाईत गाव पाठीशी
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहून पतीला न्याय कसा भेटेल हे पाहिलं पाहिजे, असा सल्ला स्वरूपानंद देशमुखांनी यापूर्वी अश्विनी देशमुखांना दिला होता. संतोष देशमुख यांच्या न्यायिक लढाईत आजही सारं गाव त्यांच्या पाठीशी आहे आणि उद्याही ते राहील. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत आमचं गाव एकत्र आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याचा सर्व ग्रामस्थांचा उद्देश असल्याचंही ते म्हटले होते मात्र निवडणुकीत उतरण्याच्या मुद्यावर बोलताना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळं ही निवडणूक आपण लवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता तर त्यांनी,”मी कुणाच्या तरी सांगण्यावरून उभा राहिलोय किंवा मला कुणी तरी जाणूनबुजून उभं केलंय असं जरा जरी कुणाला जाणवलं तर मी साऱ्या गावासमोर नाक घासून अश्विनी देशमुखांना पाठिंबा द्यायला तयार आहे,” असंही म्हटलंय.
सहानुभूतीची लाट की जनसंपर्काला साथ
अखेर स्वरूपानंद देशमुखांनी आपला अर्ज कायम ठेवत ही निवडणूक बिनविरोध होण्याची संतोष देशमुख कुटुंबाची अपेक्षा फोल ठरवली आणि मस्साजोगमध्ये अश्विनी देशमुख विरूद्ध स्वरूपानंद देशमुख असा सामना रंगण्याची खात्री पटली. या पोटनिवडणुकीत 2284 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. येत्या 28 एप्रिलला मतदान होणार असून 29 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. एकूणच काय, तर अश्विनी देशमुख विरूद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यातला हा सामना सहानुभूतीची लाट की जनसंपर्काला साथ या मुद्यावर रंगणार असून मस्साजोगचा सरपंच कोण होणार हे निकालादिवशी स्पष्ट होणार आहे.












