Supriya Sule: मुंबई- पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून खासदार सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकून राहिल्या. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपला अनुभव व्यक्त केला.
मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही बसला. त्या सुमारे दोन तासांहुन अधिक वेळ ट्रॅफिकमध्ये अडकून राहिल्या. या कोंडीमुळे त्यांचा नियोजित झेंडावंदन कार्यक्रमही चुकला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. लोणावळा घाट परिसरात रस्ता अरुंद असल्याने आणि सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची वाढलेली संख्या यामुळे वाहतूक पूर्णपणे संथ झाली होती. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.
व्हिडीओ शेअर करत सुळेंचा अनुभव
ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतःचा व्हिडीओ शेअर करत परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “आम्ही सकाळी ठाण्यावरून निघालो, पण दोन तासांपासून वाहतूक कोंडीत अडकलो आहोत.” या काळात इतर प्रवाशांशी संवाद साधत त्यांनी परिस्थिती हलक्याफुलक्या शैलीत मांडली.
काही प्रवाशांनीही सांगितले की ते सकाळी लवकर निघूनही अजून ट्रॅफिकमध्येच अडकले आहेत. सुळे यांनी यावेळी उपरोधिकपणे “महाराष्ट्र दिन स्पेशल” असे म्हणत परिस्थितीवर भाष्य केले.
झेंडावंदन कार्यक्रम चुकला
वाहतूक कोंडीमुळे सुप्रिया सुळे पुण्यात वेळेत पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे पुणे येथील पक्ष कार्यालयातील झेंडावंदनाचा कार्यक्रम माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पार पडला.
कोंडीची कारणे काय?
सलग सुट्ट्या, लोणावळा परिसरातील पर्यटन वाढ, तसेच घाट रस्त्याची अरुंद रचना यामुळे वाहतुकीवर प्रचंड ताण आला आहे. काही ठिकाणी वाहन बंद पडल्यामुळेही परिस्थिती आणखी बिघडली. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, “मिसिंग लिंक” प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या गर्दीमुळे महामार्गावर सकाळपासूनच दबाव निर्माण झाला होता. त्यामुळे काही काळासाठी पुण्याकडील वाहतूक नियंत्रित करून सोडण्यात आली, तर मुंबईकडे येणारी वाहतूक थांबली होती.












