PM Modi Meet Sharad Pawar Faction Today: शरद पवार गटाचे आठ खासदार आज सकाळी 11 वाजता खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत नेमकं काय चर्चा होणार आहे. चला तर जाणून घेऊयात.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा टप्पा सुरू होत असतानाच दिल्लीत महत्त्वाच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) 8 खासदार (Sharad Pawar Faction) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेणार आहेत. या भेटीची वेळ सकाळी 11 वाजताच्या सुमारास निश्चित असल्याची माहिती आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या बैठकीत खासदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, केंद्र सरकारशी संबंधित प्रश्न तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या भेटीची माहिती दिली आहे.
हेही वाचा: बुलढाण्याला मिळणार ‘राजमाता जिजाऊनगर’ नाव? श्वेता महालेंच्या मागणीनंतर फडणवीसांचे निर्देश
दरम्यान, संसदेत मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित म्हणजेच डिलिमिटेशनच्या (Delimitation) मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. पवार गटाचे खासदार डिलिमिटेशनच्या प्रस्तावाला विरोध करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Maharashtra Politics)
पवार गटाचे कोणते खासदार PM मोदींना भेटणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणाऱ्या खासदारांमध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिरूरचे डॉ. अमोल कोल्हे, वर्ध्याचे अमर काळे, अहमदनगरचे निलेश लंके, भिवंडीचे बाळ्यामामा म्हात्रे (सुरेश म्हात्रे), माढ्याचे धैर्यशील मोहिते पाटील, दिंडोरीचे भास्कर भगरे आणि बीडचे बजरंग सोनावणे यांचा समावेश आहे.
दुष्काळजन्य परिस्थितीचा मुद्दाही चर्चेत
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या भेटीमागे त्यांच्या मतदारसंघातील दुष्काळजन्य परिस्थितीचाही मुद्दा असल्याचे सांगितले आहे. बीडसह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या मागण्यांबाबतही पंतप्रधानांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शरद पवार गटाच्या आठ खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत होणारी ही भेट केवळ विकासकामांपुरती मर्यादित राहणार की यात डिलिमिटेशनसारख्या महत्त्वाच्या राजकीय विषयावरही चर्चा होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.









