Sri Lankan U19 Cricketers : श्रीलंकन क्रिकेटमधून एक लाजिरवाणी बातमी समोर आली आहे. कोलंबोमधील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या श्रीलंकन अंडर-19 क्रिकेट संघातील दोन खेळाडूंना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर हॉटेलच्या बाथरुममध्ये महिलांचे अंघोळ करताना गुपचूप चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. या कृत्याचा संपूर्ण संघ आणि बोर्डाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.
हेही वाचा : नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी दरवाढीचा स्फोट; व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 993
बाथरुममध्ये मोबाईल फोनचा वापर करुन अश्लील व्हिडिओ चित्रित केल्याचा आरोप :
ही घटना कोलंबोच्या नाराहेनपिटा परिसरात घडली. हॉटेलमध्ये थांबलेल्या काही महिलांनी तक्रार केली की, त्या अंघोळ करत असताना कोणीतरी मोबाईल फोननं त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी तपास केला असता, संशयाची सुई दोन तरुण क्रिकेटपटूंवर वळली. या क्रिकेटपटूंनी हे व्हिडिओ ऑनलाइन अपलोड केले होते का, याचा तपास नाराहेनपिटा पोलीस आता करत आहेत.
5 लाख रुपयांच्या जामिनावर सुटका :
अटक केल्यानंतर या दोन्ही खेळाडूंना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयानं त्यांची 5 लाख श्रीलंकन रुपयांच्या जामिनावर सुटका केली असली तरी, त्यांच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत. त्यांना 25 मे रोजी पुन्हा न्यायालयात हजर राहावं लागेल. त्यांनी असे आणखी किती गैरप्रकार केले आहेत हे निश्चित करण्यासाठी पोलिसांनी त्यांचे फोन जप्त केले आहेत.
श्रीलंका क्रिकेट बोर्डात गोंधळ :
सहसा, बोर्ड अशा कृत्यांवर तात्काळ कारवाई करते, परंतु श्रीलंका क्रिकेट बोर्ड सध्या स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. गेल्या दोन दिवसांत, बोर्डानं माजी अधिकाऱ्यांना हटवून नवीन समिती स्थापन केली आहे. या गोंधळामुळं, या खेळाडूंवर अद्याप अधिकृतपणे बंदी घालण्यात आलेली नाही, परंतु असं मानलं जात आहे की त्यांची कारकीर्द आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.








