Employment Crisis In Beed : बीड जिल्ह्यात एमआयडीसीच्या जागा आरक्षित करण्यात आल्या मात्र त्या ठिकाणी उद्योगच नसल्याने अनेक तरुण बेरोजगार आहेत. तर जे उद्योग आहेत ते कागदावरच असल्याची माहिती एमआयडीसीचे एरिया मॅनेजरच सांगत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात उद्योग कधी येणार आणि बीड जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला काम कधी मिळणार? असा प्रश्न बीडकरांना सतावत आहे. हे उद्योग जर कागदावरच राहिले तर भविष्यात बीड जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांची मोठी फळी तयार होऊन अनेक तरुण रोजगारापासून वंचित राहतील काय? अशी चिंता लागली आहे.
प्रत्यक्षात 135 उद्योगच चालू आहेत
बीड जिल्ह्यामध्ये 236 आरेखण केलेले प्लॉट आहेत. त्यापैकी 235 प्लॉट वाटप केले आहेत. मात्र, यामध्ये 180 उद्योग चालू असल्याचे आपल्याला कागदोपत्री दिसत असून प्रत्यक्षात 135 उद्योगच चालू आहेत तर उर्वरित 55 उद्योग बंद आहेत. आष्टी तालुक्यात 71 प्लॉट आरेखण केलेले आहे. त्यापैकी 48 वाटप केलेले आहेत. तर केवळ 6 उद्योग त्या ठिकाणी चालू आहेत. धारूर एमआयडीसीमध्ये 74 प्लॉट आरेखण केलेले आहेत. त्यापैकी त्यापैकी 54 भूखंड वाटप केलेले आहे. तर केवळ 9 उद्योग चालू आहेत.
माजलगाव एमआयडीसी 194 भूखंड कार्यक्रम
पाटोदा येथे 26 भूखंड आरेखन केलेले आहेत. त्यापैकी 23 वाटप केलेले आहेत. तर प्रत्यक्षात केवळ 3 उद्योग चालू आहेत.. माजलगाव एमआयडीसी 194 भूखंड कार्यक्रम केले आहेत. त्यापैकी 80 भूखंड वाटप केले आहेत. त्यामध्ये 9 उद्योग चालू आहेत. यामध्ये गेवराई आणि शिरसाळा या भागांमध्ये एमआयडीसी प्रस्तावित आहे. त्यासाठी जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. आरेखण व दर निश्चितीचा प्रस्ताव मुख्यालयाला सादर करण्यात आला आहे.
पाच ठिकाणी एमआयडीसीची जागा आरक्षित
दरम्यान, पाहायला गेला तर बीड जिल्ह्यात पाच ठिकाणी एमआयडीसीची जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवर बोटावर मोजण्या एवढेच उद्योग उभा राहिले आहेत. अशा पद्धतीने बीड जिल्ह्यात उद्योगाची परिस्थिती असल्यामुळे याकडे उद्योग मंत्री उदय सामंत लक्ष देतील का? आणि बीड जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला काम देतील का? हे येणाऱ्या काळात पाहणे गरजेचे आहे.










