Today Share Market : बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात उत्तुंग तेजीनं झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य-पूर्वेतील तणाव कमी करण्याबाबत विधान केलं आणि इतर जागतिक शेअर बाजारांसोबत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही मोठी वाढ झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30-शेअर सेन्सेक्स उघडताच 600 हून अधिक अंकांनी वधारला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीदेखील 200 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला. या दमदार सुरुवातीमुळं महिंद्रा अँड महिंद्रापासून ते इंडिगो आणि एसबीआयपर्यंतच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली.
हेही वाचा : ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी राजीनामा देणार नाही; असं झाल्यास काय
सेन्सेक्स-निफ्टीची वाढ :
शेअर बाजारात व्यवहार सुरु होताच, बीएसई सेन्सेक्स त्याच्या मागील बंद भावापेक्षा (77,017) 77,424 वर उघडला. काही मिनिटांतच, तो 658 अंकांनी वाढून 77,675 वर पोहोचला. सेन्सेक्सप्रमाणेच, एनएसई निफ्टी 50 मध्येही सुरुवातीपासूनच मोठी वाढ दिसून आली. निर्देशांक त्याच्या मागील बंद भावापेक्षा (24,032) वाढून 24,171 वर उघडला आणि नंतर अचानक 218 अंकांनी उसळी घेत 24,250 वर पोहोचला.
तेजीची चिन्हं आधीच दिसू लागली :
हे लक्षात घ्यायला हवं की भारतीय शेअर बाजारात तेजीची चिन्हं आधीच दिसू लागली होती. सर्व जागतिक बाजारपेठांमध्ये तेजी दिसून आली. मंगळवारी अमेरिकन शेअर बाजार तेजीसह बंद झाला, तर जपान निक्केई, हाँगकाँग हँग सेंग आणि दक्षिण कोरिया कोस्पी यांसारख्या आशियाई शेअर बाजारांमध्येही उघडताना जोरदार तेजी दिसून आली. गिफ्ट निफ्टीनंही उघडताना तेजी दर्शवली, ज्यामुळं सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ होण्याचे संकेत मिळाले.
या तेजीमागे ट्रम्प कनेक्शन :
आता, शेअर बाजारातील या तेजीमागील कारणांवर चर्चा करुया. हे थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जोडलेले असल्याचे दिसते (शेअर बाजार ट्रम्प कनेक्शन). खरं तर, होर्मुझमध्ये अडकलेली जहाजे बाहेर काढण्यासाठी सुरु करण्यात आलेला ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ काही काळासाठी थांबवण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे, तसंच अमेरिका आणि इराण लवकरच एका करारावर पोहोचू शकतात असेही संकेत दिले आहेत.








