Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची नाशिक एसआयटीसमोर चौकशी सुरू झाली आहे. आज सकाळी चाकणकर यांनी पुण्याहून नाशिकला जात तपास यंत्रणेसमोर हजेरी लावली. रूपाली चाकणकर या वकिलांसोबत चौकशीसाठी (SIT Inquiry) पोहचल्या. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता असा आरोप आहे. त्याशिवाय खरात यांच्या शिवानिका संस्थाच्या विश्वस्तपदी रूपाली चाकणकर होत्या. त्यामुळे आर्थिक व्यवहारांबाबतही (Financial transactions) चाकणकर यांची चौकशी करण्यात येत आहे.
एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते या रूपाली चाकणकर यांची चौकशी करत आहेत. खरातशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत ही चौकशी होत आहे. या चौकशीला हजर होण्यापूर्वी चाकणकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, आज जो एसआयटीचा तपास सुरू आहे, त्यांना काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. ती देण्यासाठी मी आली आहे. तपासात माझे पूर्णपणे सहकार्य राहील. तपास यंत्रणेला जी काही मदत लागेल ती निश्चितपणे केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळातील ४ मंत्र्यांचा समावेश
खरात प्रकरणात राज्याच्या मंत्रिमंडळातील ४ मंत्र्यांचा समावेश आहे. या मंत्र्यांची हकालपट्टी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार असून भोंदू खरातकडून सगळी माहिती गोळा करून त्याचा एन्काऊंटर केला जाईल असा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. मात्र ४ मंत्र्यांची नावे आहेत, त्यांचा यात सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ती नावे मुख्यमंत्र्यांकडे द्यावीत किंवा जाहीर करावीत. याची निश्चितपणे चौकशी केली जाईल. मात्र ठोकताळ्यावर अंदाजपणे नावे सांगणे आणि प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी असणे हा भाग वेगळा आहे. त्यामुळे ही नावे मुख्यमंत्र्यांना द्यावीत. माध्यमांसमोर जायचे असेल तर ती नावे उघडही करावी असा टोला मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
अंजली दमानिया यांचा एसआयटीवर गंभीर आरोप
दरम्यान, तपास यंत्रणेत पतसंस्थांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी होईल परंतु ज्या राजकीय नेत्यांचा या प्रकरणात सहभाग आहे त्यांची चौकशी कोण करणार असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. माझ्याकडे आलेली सगळी माहिती, त्यातील आर्थिक गैरव्यवहार हे सगळे एसआयटीकडे पाठवले तरीही त्याची चौकशी झाली नाही, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.












