MIM leader bulldozer action : नाशिकमधील एका प्रसिद्ध आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने बुलडोझर चालवला आहे. ही कारवाई आज पहाटे नारेगाव परिसरात करण्यात आली. विशेष म्हणजे, निदा खानला ज्या घरात लपवण्यात आले होते, ते घरही लवकरच जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मतीन पटेल यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ४७८ (२) अंतर्गत नोटीस बजावली होती. या नोटिसीनुसार २४ तासांच्या आत अवैध बांधकाम स्वतःहून हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र पटेल यांनी खुलासा सादर करत मुदतवाढ मागितली. प्रशासनाने त्यांचे कागदपत्रे आणि स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे सांगत मुदतवाढ फेटाळली. काल न्यायालयानेही याप्रकरणी मतीन पटेल यांना कोणताही दिलासा न देता कारवाईला परवानगी दिली. त्यानंतर आज पहाटे महापालिकेचे पथक बुलडोझर घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात
कारवाई सुरू होताच मतीन पटेल यांनी काही अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली. तरीही महापालिकेच्या पथकाने उर्वरित अवैध बांधकाम हटवण्याची प्रक्रिया सुरू केली. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जर संबंधित व्यक्तीने पूर्ण बांधकाम हटवले नाही तर महापालिका ते पाडेल आणि संपूर्ण कारवाईचा खर्च नगरसेवकाकडून वसूल करण्यात येईल.
नागरिकांनी उपायुक्तांसह कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण
या कारवाईदरम्यान नारेगाव परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अणुचित प्रकार उद्भवू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट व्यवस्था केली होती. मात्र, आश्चर्यकारकपणे स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले. अतिक्रमण हटाव पथक घटनास्थळी पोहोचताच नागरिकांनी उपायुक्तांसह कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण केली. काहींनी हार घालून प्रशासनाचे आभार मानले. यामुळे परिसरात सकाळपासूनच चर्चेला उधाण आले आहे.
आश्रय दिल्याच्या आरोपामुळे राजकीय आणि सामाजिक दबाव
निदा खान प्रकरणामुळे मतीन पटेल यांच्यावर आधीपासूनच मोठा राजकीय आणि सामाजिक दबाव होता. त्यांना आश्रय दिल्याच्या आरोपामुळे एमआयएम पक्षाला देखील टीकेचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या या ठोस कारवाईमुळे शहरातील अतिक्रमणांविरुद्ध प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.












