Rohit Pawar Sunil Shelke controversy : महाराष्ट्राच्या राजकारणातील अंतर्गत कलह, पक्षांतराच्या चर्चा आणि नेत्यांमधील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील संघर्ष सातत्याने नवनवीन वळणे घेत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका खळबळजनक राजकीय दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. आमदार सुनील शेळके हे सुनेत्रा पवारांची यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असा दावा रोहित पवार यांनी केला.
रोहित पवारांच्या या दाव्यावर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अत्यंत आक्रमक आणि खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले असून, “रोहित पवारांनी ज्योतिषाचा हा नवा धंदा कधीपासून सुरू केला?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. या संपूर्ण वादामुळे मावळ तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीमधील आमदारांबाबत एक मोठा दावा केला होता. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार सध्या अस्वस्थ असून, स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी ते भाजपच्या संपर्कात असल्याचा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा – PM मोदी अन् CM फडणवीसांकडून ताफ्यात काटकसर, मंत्र्याचा कहर
यामध्ये प्रामुख्याने मावळचे आमदार सुनील शेळके, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आगामी काळात भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. अजित पवार गटातील जवळपास २२ आमदार भाजपमध्ये विलीन होऊ शकतात किंवा त्यांच्या चिन्हावर मैदानात उतरू शकतात, असे भाकीत त्यांनी वर्तवले होते. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळवणे आणि केंद्रीय यंत्रणांच्या दबावापासून स्वतःचा बचाव करणे, याच उद्देशाने हे सर्व नेते भाजपच्या आहारी जात असल्याचा गंभीर आरोपही रोहित पवारांनी आपल्या वक्तव्यात केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुती आणि विशेषतः अजित पवार गटामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.
प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी रोहित पवारांचे खोटे दावे
रोहित पवारांच्या या वक्तव्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच आमदार सुनील शेळके यांनी तातडीने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आणि रोहित पवारांचा समाचार घेतला. शेळके म्हणाले की, रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून केवळ आणि केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन खोटे दावे करत आहेत. त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नसताना ते ज्येष्ठ नेत्यांबद्दल आणि सहकाऱ्यांबद्दल अशी बेजबाबदार वक्तव्ये करत सुटले आहेत. लोकांचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून भरकटवण्यासाठी आणि महायुतीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यासाठीच हा जाणीवपूर्वक रचलेला डाव असल्याचा आरोप शेळके यांनी केला. रोहित पवारांनी दुसऱ्यांच्या पक्षाची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे आणि मतदारसंघाकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
रोहित पवारांनी ज्योतिषाचा नवा धंदा सुरू केलाय
सुनील शेळके यांनी रोहित पवारांच्या ज्योतिषाच्या भूमिकेची थट्टा उडवताना सांगितले की, “राजकारणात काम करणाऱ्या नेत्याला जनतेच्या प्रश्नांची जाण असावी लागते. मात्र रोहित पवार हे जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी लोकांचे भविष्य सांगण्यात जास्त वेळ घालवत आहेत. त्यांनी हा ज्योतिषाचा नवा धंदा कधीपासून सुरू केला, हे एकदा महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगावे.” शेळके पुढे म्हणाले की, आपण ज्या पक्षात आहोत, तिथे अत्यंत समाधानी असून सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्याचा ऐतिहासिक विकास होत आहे. महायुती सरकारकडून मतदारसंघातील रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षणाच्या विविध प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सर्व कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे आपल्याला इतर कोणत्याही पक्षात जाण्याची किंवा दुसऱ्या चिन्हावर लढण्याची अजिबात गरज नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.












