Shinde Danve handshake politic : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज विधान परिषदेच्या आमदाराची शपथ घेतली आहे. दानवेंनी शपथ घेताच त्यांच्या विरोधी पक्षनेता पदाची चर्चा सुरु झाली आहे. सभागृहात आज दानवेंसह एकूण 10 सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. यावेळी दानवे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात काहीवेळ चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलनही केलं. शिवसेनेत दोन गट झाल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसतात. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांकडे बघणं देखील टाळतात. शिंदे अनेकदा ठाकरेंवर टीका करताना दिसतात. दोन्ही गट एकमेकांचे कट्टर विरोधक असताना देखील आज एकनाथ शिंदे आणि दानवे यांच्यात खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये ठाकरे गटाने अंबादास दानवेंवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा दिली होती. त्यामुळे ऑगस्ट 2025 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला होता. त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना महायुती सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून आपला कार्यकाळ गाजवला होता. मात्र शिवसेनेचे आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेल्या दानवेंना निवृत्ती घ्यावी लागली. ते पुन्हा आता आमदार बनू शकणार नाही, असं म्हटलं जात होतं.
हेही वाचा – CM फडणवीसांची विधान भवनात बाईकवरून एन्ट्री, प्रोटोकॉलचे काय?
कारण 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. त्यांच्याकडे फक्त एकच आमदार निवडून देण्याचं संख्याबळ होतं. या जागेवर देखील उद्धव ठाकरे निवडून जाणार असल्याची चर्चा होती. काँग्रेसने जाहीर केले की उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच आम्ही पाठिंबा देऊ. ठाकरे गटाकडे आमदार निवडून आणण्यासाठी संख्याबळ नव्हते त्यामुळे ठाकरे गट अडचणीत सापडला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी धाडसी निर्णय घेत दानवेंना उमेदवारी जाहीर केली. जर ठाकरे उमेदवार झाले असते, तर दानवेंना 2029 च्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहावी लागली असती.
अद्याप दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही..
विधानसभा निवडणुका होऊन आणि महायुतीने सरकार स्थापन करुन जवळपास दीड ते 2 वर्ष होत आले आहे. मविआकडे संख्याबळ नसल्याने अद्याप दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही. दोन्ही पदं सध्या खालीच आहेत. मविआने अनेकवेळा विरोधी पक्षनेता पदाची मागणी केली आहे, मात्र अद्याप दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद मिळालेले नाही. पण आता दानवेंनी विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतली आहे. दानवेंचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची जागा दानवेंना देताच काँग्रेस आक्रमक झाली होती. काँग्रेसने आम्ही पाठिंबा देणार नसल्याचे म्हटले होते. मात्र दानवेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर नेत्यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसने दानवेंना पाठिंबा दर्शवला.
आता विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी दानवे आपल्या संबंधांचा वापर करु शकतात. दानवेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह इतर सर्व भाजप नेत्यांशी चांगले संबंध आहे. तसेच दानवेंचे एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील सर्वच नेत्यांशी चांगले संबंध आहे. राष्ट्रवादीतील नेतेही दानवेंना मानतात. त्यामुळे आता दानवे फडणवीसांशी चर्चा करुन लवकरच आपल्या पदरात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद पाडून घेतील असं म्हटलं जात आहे.
दानवे आपल्या राजकीय संबंधाचा वापर करुन विरोधी पक्षनेते बनतील
विरोधी पक्षनेता पद मिळवण्यासाठी पक्षाकडे एकूण जागाच्या 10 टक्के संख्याबळ असणे गरजेचे आहे. सध्या ठाकरे गटाकडे 20 जागा आहेत. त्यांना अजून 9 जागा कमी पडतात. मात्र जेव्हा कोणत्याही पक्षाकडे संख्याबळ नसते, तेव्हा विधान परिषेदेचे सभापती आणि विधानसभा अध्यक्ष याबाबत निर्णय घेऊ शकतात. आता विधान परिषदेत लोकशाहीच्या रक्षणासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे निर्णय घेत विरोधी पक्षनेत्याची घोषणा करु शकतात. ज्या पक्षाकडे जास्त संख्याबळ आहे, त्या पक्षाच्या नेत्याला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे विरोधी पक्षनेता म्हणून घोषित करु शकतात. त्यामुळे आता दानवे आपल्या राजकीय संबंधाचा वापर करुन लवकरच विरोधी पक्षनेते बनतील असं म्हटलं जात आहे.












