Raj Thackeray court hearing case : सन २००८ मधील बहुचर्चित ऑल इंडिया रेल्वे भरती (railway recruitment) बोर्डाच्या परीक्षा गोंधळ आणि उत्तर भारतीय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह सर्व आरोपी ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात (Thane Court) हजर झाले. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज ठाकरे आणि इतर पाच आरोपींवर असलेले आरोप प्रत्यक्ष वाचून दाखवले. न्यायमूर्तींनी विचारलेल्या धारदार प्रश्नांना उत्तर देताना माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही, घटना घडली तेव्हा मी नाशिकला होतो, ही संपूर्ण केस राजकीय दबावातून केलेली खोटी केस आहे, असा स्पष्ट आणि आक्रमक पवित्रा मनसे प्रमुखांनी न्यायालयात घेतला. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या खटल्याची पुढील (The 2008 Lawsuit) सुनावणी १८ मे रोजी निश्चित केली आहे.
सुनावणी सुरू झाल्यानंतर न्यायाधीशांनी साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे राज ठाकरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. न्यायाधीशांनी विचारले की, १८ ऑक्टोबर २००८ रोजी रेल्वे विभागात परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, हे खरं आहे की खोटं? त्यावर राज ठाकरे यांनी हे संपूर्णपणे खोटं असल्याचे सांगितले. न्यायाधीशांनी पुढे विचारले की, तुमच्या विरोधात खोटी केस केली असं तुमचं म्हणणं आहे, त्याचं नेमकं कारण काय? यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, जेव्हा ही घटना घडली, तेव्हा मी येथे उपस्थित नव्हतोच. काही वैयक्तिक आणि पूर्वियोजित कारणांमुळे मी नाशिकला गेलो होतो.
हेही वाचा – 17 वर्षांनंतर पुन्हा गाजणार राज ठाकरेंची ‘ती’ केस; आज ठाणे कोर्टात हजेरी
रेल्वेची परीक्षा द्यायला आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण
न्यायाधीशांनी पुढील प्रश्न उपस्थित केला की, ज्या प्रकारे साक्षीदारांनी जबाब नोंदवले आहेत, त्यानुसार तुमच्या मनसे कार्यकर्त्यांनी लाठी-काठी घेऊन रेल्वेची परीक्षा द्यायला आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण केली, याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? राज ठाकरे यांनी हे देखील खोटं असून माझा याच्याशी संबंध नसल्याचा पुनरुच्चार केला. न्यायाधीशांनी पुढचा मुद्दा मांडला की, ज्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, त्यांच्या खिशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची अधिकृत सदस्य कार्डे सापडली आहेत, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? राज ठाकरे यांनी यावरही आमच्या विरोधात हेतुपरस्सर खोटी केस दाखल करण्यात आल्याचे सांगितले.
मी पुन्हा सांगतो की मी येथे नव्हतोच, मी मुंबईबाहेर होतो
न्यायाधीशांनी भाषणाचा संदर्भ देत विचारले की, तुम्ही जे चिथावणीखोर भाषण केलं, त्यामुळेच हा सगळा हिंसाचार घडला असा साक्षीदारांच्या जवाबात उल्लेख आहे. पोलिसांनी त्या भाषणाची सीडी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ती मिळाली नाही, यावर काय सांगाल? राज ठाकरे यांनी हे पूर्णपणे खोटं असल्याचे सांगत मी पुन्हा सांगतो की मी येथे नव्हतोच, मी मुंबईबाहेर होतो, असे स्पष्ट केले. शेवटी न्यायाधीशांनी तुम्हाला या केसबद्दल आणखी काही विशेष बोलायचं आहे का, असे विचारले असता राज ठाकरे यांनी सांगितले की, या केसला आता तब्बल २० वर्षे पूर्ण होत आली आहेत. मी सुरुवातीपासून सांगत आहे की, त्या विशिष्ट दिवशी मी इथे नव्हतो, मी नाशिक मुक्कामी होतो.
हा खटला पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे – राज
राज ठाकरे यांच्यासोबत कोर्टात हजर असलेल्या उर्वरित पाच आरोपींनीही आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. आरोपींच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, ज्यावेळी ही घटना घडली, त्यानंतरच्या तत्कालीन राज्य सरकारने केवळ राजकीय सूडबुद्धीने आणि मनसे वाढू नये म्हणून पोलिसांवर दबाव आणला. त्या दबावापोटीच ही संपूर्ण केस आणि दोषारोपपत्र तयार करण्यात आले आहे. त्यामुळे हा खटला पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे.
भूमीपुत्रांच्या रोजगाराचा हक्क हिरावला जात असल्याचा मुद्दा
हे संपूर्ण प्रकरण ऑक्टोबर २००८ मधील आहे, ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक मोठी कलाटणी दिली होती. २००८ मध्ये रेल्वे प्रशासनाकडून केंद्रीय स्तरावर मोठी नोकरभरती प्रक्रिया राबवली जात होती. मनसेचा असा आरोप होता की, महाराष्ट्रातील रेल्वेच्या जागांवर स्थानिक मराठी तरुण-तरुणींना डावलून उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मोठ्या प्रमाणावर उमेदवारांना बोलावले जात आहे. स्थानिक भूमीपुत्रांच्या रोजगाराचा हक्क हिरावला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत मनसेने या भरतीला तीव्र विरोध दर्शवला होता.
यानंतर १९ ऑक्टोबर २००८ रोजी कल्याण आणि मुंबईतील विविध परीक्षा केंद्रांवर रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा सुरू असताना परीक्षा देण्यासाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले. कल्याण रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्तर भारतीय परीक्षार्थींना परीक्षा केंद्राबाहेर काढले व लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. या आंदोलनादरम्यान रेल्वे स्थानकांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
दंगल घडवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे
या घटनेनंतर कल्याण रेल्वे पोलीस आणि डोंबिवली पोलिसांनी राज ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर दंगल घडवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. ऑक्टोबर २००८ मध्ये राज ठाकरे यांना रत्नागिरीतून अटक करण्यात आली होती, ज्यामुळे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते आणि मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी कल्याण न्यायालयात चालत होती, परंतु नंतर सुरक्षेच्या आणि तांत्रिक कारणास्तव हे प्रकरण ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आले.
खटल्याची पुढील सुनावणी १८ मे रोजी निश्चित
या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली असून न्यायालयाने या खटल्याची गती वाढवली आहे. आगामी १८ मे रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय उर्वरित तांत्रिक पुराव्यांची आणि साक्षीदारांच्या जबाबांची तपासणी करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या वकिलानी दिलेल्या माहितीनुसार, आज न्यायालयात राज ठाकरेंचा जबाब कायदेशीररीत्या नोंदवून पूर्ण झाला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या पुढील आदेशाशिवाय त्यांना प्रत्येक सुनावणीला वैयक्तिकरीत्या हजर राहण्याची आवश्यकता नसेल. २० वर्षांपूर्वीच्या या राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचा कायदेशीर निकाल काय येतो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.











