• Home
  • ताज्या बातम्या
  • भिंती कोसळल्या, झाडे पडली… उत्तर प्रदेशात वादळाचा कहर; 37 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली लोक गाडल्याने खळबळ
Top News

भिंती कोसळल्या, झाडे पडली… उत्तर प्रदेशात वादळाचा कहर; 37 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली लोक गाडल्याने खळबळ

up storm

Uttar Pradesh Storm | उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) निसर्गाचे रौद्ररूप पहायला मिळाले. काल (13 मे) संध्याकाळी उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळाने (Storm) हाहाकार माजवला होता. या वादळामुळे 37 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच या वादळामुळे अनेक इमारतींच्या भिंती कोसळल्या आहेत, झाडे पडली आहेत. तर इमारतींच्या भिंती कोसळून त्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – एअर इंडियाकडून मोठा धक्का; ‘या’ मार्गांवरील उड्डाणे रद्द, प्रवाशांचा खोळंबा

उत्तर प्रदेशमध्ये वादळाचं रौद्ररूप, अनेकजणांचा दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, बदाऊन, फतेहपूर आणि भदोही या जिल्ह्यांमध्ये वादळाने हाहाकार माजवला आहे. यामध्ये फतेहपूरमध्ये वादळामुळे अनेक इमारतींच्या भिंती कोसळल्याने 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर प्रयागराजमध्ये 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोबतच भदोहीमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच बदाऊनमध्ये जोरदार वादळामुळे 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रयागराजमध्ये आलेल्या भीषण धुळीच्या वादळाने आणि पावसाने मोठा कहर केला. वादळामुळे झालेल्या घटनांमध्ये जिल्ह्यात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच फुलपूरमध्ये चार, सोरावनमध्ये तीन, मेजामध्ये दोन आणि सदर परिसरात एकाचा मृत्यू झाला आहे. या जोरदार वादळात 20 जनावरे ठार झाली असून अनेक इमारतींचे, घरांचे नुकसान झाले आहे.

बदाऊनमध्ये भीषण धुळीचे वादळ आणि पावसामुळे झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि पाच जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळामुळे एक भिंत कोसळली आणि त्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले असून दोन मुलींच्या मृत्यू झाला आहे.

दरम्यान, सध्या जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाची पथके सर्व तालुक्यांमधून नुकसानीची माहिती गोळा करण्याचे काम करत आहेत. वित्त आणि महसूल विभागाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी विनिता सिंह यांनी सांगितले की, मृतांचा आकडा वाढू शकतो. सध्या प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले असून, पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरू केला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts