Sunil Tatkare meets Sharad Pawar : राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) गेल्या चोवीस तासांत कमालीच्या वेगाने बदललेल्या घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा एका मोठ्या वळणावर आणून ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत धुसफूस, अंतर्गत सत्तासंघर्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत झालेल्या गुप्त भेटीगाठी यांमुळे महायुती आणि विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (Nationalist Congress Party) अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. या संपूर्ण राजकीय नाट्याची सुरुवात गुवाहाटी दौऱ्यापासून (Guwahati Toors) झाली असली, तरी त्याचा खरा क्लायमॅक्स काल मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीने झाला आहे. या भेटीचे पडसाद केवळ राष्ट्रवादीतच नव्हे, तर संपूर्ण महायुतीत उमटत असून आगामी काळातील मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत यातून मिळत आहेत.
या संपूर्ण घडामोडींचा पाया गुवाहाटी दौऱ्याच्या वेळीच रचला गेला होता. एका विशेष धार्मिक विधीसाठी आणि राजकीय गाठीभेटींसाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचा एक गट गुवाहाटीला रवाना झाला होता. या दौऱ्यासाठी विमानांच्या झालेल्या नियोजनातूनच अंतर्गत मतभेदांची पहिली ठिणगी पडली. गुवाहाटीला जाताना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी आरक्षित असलेल्या विशेष विमानाने प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, खरा ट्विस्ट गुवाहाटीहून परतताना आला.
हेही वाचा – मोठी राजकीय हालचाल! सुनील तटकरे यांची शरद पवारांना सिल्व्हर ओकवर भेट; नेमकं कारण काय?
सखोल राजकीय रणनीती आणि अंतर्गत नाराजी
परतीच्या प्रवासात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या विमानाने प्रवास न करता, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष विमानाचा आसरा घेतला. एकाच पक्षातील दोन अत्यंत ज्येष्ठ नेत्यांनी जाताना एका नेत्याच्या विमानाने जाणे आणि परताना मुख्यमंत्र्यांच्या विमानाने येणे, यावरून पक्षात काहीतरी गंभीर शिजत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. या विमान प्रवासाच्या बदललेल्या गणितांमागे केवळ तांत्रिक कारणे नव्हती, तर त्यामागे सखोल राजकीय रणनीती आणि अंतर्गत नाराजी दडलेली होती. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यातील वाढता तणाव हे यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते.
जुन्या फळीत पार्थ पवार यांचा हस्तक्षेप वाढल्याची भावना
गेल्या काही काळापासून पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत आणि संघटनात्मक बांधणीत पार्थ पवार यांचा हस्तक्षेप वाढल्याची भावना जुन्या फळीतील नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे तटकरे आणि पटेल हे दोन्ही नेते कमालीचे नाराज होते. हाच वाद गुवाहाटी दौऱ्यादरम्यान उफाळून आला आणि त्याची परिणती परतीच्या प्रवासात विमान बदलण्यात झाली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पार्थ पवार यांच्यासोबत एकाच विमानातून प्रवास करणे जाणीवपूर्वक टाळले, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
केंद्रीय कार्यकारिणीत ज्येष्ठ नेत्यांची नावे अचानक गायब
या अंतर्गत वादाला अधिकृत बळ मिळाले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या नवीन यादीमुळे. पक्षांतर्गत फेररचना करताना अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला जी नवी यादी सोपवण्यात आली, त्यातून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन अत्यंत बलाढ्य आणि ज्येष्ठ नेत्यांची नावे अचानक गायब झाल्याचे समोर आले. पक्षाच्या स्थापनेपासून आणि त्यानंतरच्या प्रत्येक राजकीय घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या दोन नेत्यांना कार्यकारिणीतून वगळले जाणे, हा या नेत्यांसाठी व्यक्तिगत आणि राजकीय धक्का होता. या यादीतून नाव वगळले जाण्यामागेही पार्थ पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा मोठा हात असल्याचा संशय तटकरे समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. आपल्याच पक्षाकडून अशा प्रकारे बाजूला सारले गेल्यामुळे तटकरे आणि पटेल यांच्यातील अस्वस्थता शिगेला पोहोचली होती.
रुबी हॉस्पिटल फार काही लांब नव्हतं, तटकरे साहेब…
निवडणूक आयोगाच्या यादीतून नाव वगळले जाणे, परतीच्या प्रवासात मुख्यमंत्र्यांच्या विमानाने प्रवास करावा लागणे आणि पक्षांतर्गत वाढती कोंडी या सगळ्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत एका अत्यंत अनपेक्षित घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी झालेली ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र राजकीय वर्तुळात याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. अजित पवारांची साथ सोडून महायुतीत सामील झाल्यानंतर तटकरे आणि शरद पवार यांच्यात कमालीचे अंतर निर्माण झाले होते. असे असतानाही तटकरेंनी शरद पवारांची घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट असू शकत नाही, असा ठाम कयास राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. तटकरे या भेटीवर बोलताना म्हणतात प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली, मात्र प्रकृतीचीच विचारपूस करायची होती, तर रुबी हॉस्पिटल फार काही लांब नव्हतं, तटकरे साहेब… असं जाणकार म्हणत आहेत.
शरद पवारांकडून तटकरेंना संयम ठेवण्याचा सल्ला
बरं या बंद दाराआड झालेल्या भेटीत सुनील तटकरे यांनी शरद पवारांसमोर आपली व्यथा मांडल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्षात जुन्या नेत्यांना दिली जाणारी वागणूक, पार्थ पवार यांचा वाढता हस्तक्षेप आणि निवडणूक आयोगाच्या यादीतून नाव वगळले गेल्यामुळे झालेली मानहानी यावर तटकरेंनी पवारांशी सविस्तर चर्चा केल्याचे समजते. शरद पवारांनीही तटकरे यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि त्यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुरूवातीला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला कडाकडून विरोध करणारी पटेल तटकरेंची जोडी आता अचानक आपले सूर बदलू लागलीय, या भेटीमुळे आता राष्ट्रवादी एकाच गोटात परतणार का? की महायुतीमधील अंतर्गत समीकरणांमध्ये काही मोठा बदल होणार, यावर चर्चा सुरू झाली आहे. तटकरे यांच्यापाठोपाठ प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी या वादात अधिकच तेल ओतले आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही महाराष्ट्रातील या घडामोडींवर बारीक लक्ष
या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार गटाकडून अधिकृतपणे कोणतीही मोठी प्रतिक्रिया आलेली नाही. हा पक्षाचा अंतर्गत विषय असून योग्य वेळी यावर स्पष्टीकरण दिले जाईल, असे सांगून प्रवक्त्यांनी वेळ मारून नेली आहे. पार्थ पवार आणि ज्येष्ठ नेत्यांमधील हा वाद वेळीच मिटवला नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला याचे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, याची जाणीव पक्षाला आहे. दुसरीकडे, फडणवीस यांच्या विमानाचा वापर तटकरे आणि पटेलांनी केल्यामुळे भाजपाच्या गटातही यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही महाराष्ट्रातील या ताज्या घडामोडींची गंभीर दखल घेतली असून, महायुतीमधील अंतर्गत स्थैर्याला धक्का बसणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत.
विमानांचे राजकारण, पार्थ पवार यांच्याशी असलेले मतभेद
एकंदरीत पाहता, निवडणूक आयोगाची यादी, गुवाहाटी दौऱ्यातील विमानांचे राजकारण, पार्थ पवार यांच्याशी असलेले मतभेद आणि काल झालेली शरद पवारांची भेट या सर्व घटना एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता मिळवणे जितके कठीण आहे, तितकेच ती सत्ता आणि अंतर्गत संतुलन टिकवून ठेवणे आव्हानात्मक असते, याचा प्रत्यय या घडामोडींवरून येत आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत चतुर खेळाडू मानले जातात. त्यामुळे त्यांनी उचललेले हे पाऊल केवळ नाराजीतून आलेले नाही, तर त्यामागे भविष्यातील सुरक्षित राजकीय पुनर्वसनाची मोठी योजना असू शकते. येत्या काही दिवसांत या भेटीगाठींचे आणि अंतर्गत संघर्षाचे नेमके काय परिणाम होतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते, हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे.












